“हे राणे स्वत:ला समजतात काय? तिघांना शिस्त लावली पाहिजे”
भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी नुकतंच मालवण नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढत मुख्य कार्यकारी अधिकारी जिर्गे यांना धारेवर धरलं होतं. आत्ता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे असा दमही निलेश राणे यांनी सर्वांसमोर दिला होता. निलेश राणेंच्या या वर्तवणुकीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. हे राणे कुटुंबीय स्वत:ला काय समजतात? अशी विचारणा त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे.
“नितेश राणे, निलेश राणे आणि नारायण राणे यांची भाषा आणि वागण्याची पद्धत यावर वारंवार चर्चा होत असते. निलेश राणे कोणत्या हक्काने तिथे गेले होते सध्या हे सामान्य नागरिक असून त्याप्रमाणेच वागलं पाहिजे. प्रत्येक अधिकाऱ्याला मान सन्मान दिलाच पाहिजे. आपण त्यांना प्रश्न विचारु शकतो, पण त्याची एक पद्धत असते. आम्हीदेखील अनेक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतो. पण कुठे बसतो, बोलतो यांच भान ठेवायाल हवं,” असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
“ही काय भाषा आहे, हे स्वत:ला काय समजतात? सरकारी अधिकाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांच्याविरोधात लगेच गुन्हा दाखल झाला पाहिजे,” अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. तिघांनाही शिस्त लावली पाहिजे असंही त्या म्हणाल्या आहेत.
“ही प्रवृत्ती आणि सत्तेचा माज “
“ही गुंडगिरी, मवालगिरी काही नवीन नाही. याआधी एका अभियंत्याला चिखलाने माखलं होतं. अनेक वर्ष लोक ही गुंडगिरी का सहन करत आहेत? पण प्रत्येकाचा दिवस येत असतो. ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा उगम असतो त्याप्रमाणे त्याचा अंतही असतो,” अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केली आहे.
“नारायण राणे आज केंद्रीय मंत्री झाले असले तरी अद्याप गल्लीतील भाषा वापरत आहेत. आपण केंद्रीय मंत्री आहोत हे अद्यापही त्यांनी कळत नाही आहे,” असंही टीकास्त्र त्यांनी सोडलं. “केसरकर आणि सगळे त्यांच्यासोबत गेले असतानाही आपापसात भांडतच आहेत. ही प्रवृत्ती आणि सत्तेचा माज आहे. पण एक ना एक दिवस प्रत्येकाचा येतो,” असा इशाराही त्यांनी दिला.
नेमकं काय झालं होतं?
मालवण नगरपरिषद कार्यक्षेत्रात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे गटार साफसफाईचा मुद्दा उपस्थित झाला होता. बाजारपेठांसहित अनेकांच्या घरात पाणी गेल्याने नगरपरिषदेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. स्थानिकांनीही याबद्दल नाराजी जाहीर केली होती. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे मालवण नगरपरिषदेत पोहोचले होते.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिर्गे यांचा कार्यकाळाचा पाढाच वाचला. निलेश राणे यांनी यावेळी त्यांनी तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात का? अशी विचारणा केली. तसंच मी याआधीही तुम्हाला एका वाईन शॉपची तक्रार दिली होती, पण तुम्ही कारवाई केली नाही याची आठवण करुन दिली.’आम्ही सत्तेत नव्हतो तेव्हा गप्प बसलो नाही. आज तर आमचीच सत्ता आहे. आता टेबल फिरलं आहे. आज काय करणार आहात?,” अशी विचारणा यावेळी निलेश राणेंनी केली.
तुम्ही शहराचं वाटोळ लावलं आहे सांगत ती फायर ब्रिगेडची गाडी गल्लीत जाणार का? असं निलेश राणेंनी विचारलं.आमच्या वाकड्यात जाऊ नका असं गेल्यावेळी सांगितलं होतं, आज ते आमदार आहेत का तुम्हाला वाचवायला असंही ते म्हणाले. ठराविक नगरसेवकांच्या मतदारसंघात नालेसफाई करायचं ठरवलं आहे का? असंही त्यांनी विचारलं. “मी तुमच्या हातात निवेदन देणार नाही, आपले हात पवित्र नाहीत. त्यामुळे टेबलावरचे निवेदन उचलून दिलेली कामे तातडीने मार्गी लावा,” असं निलेश राणेंनी यावेळी सांगितलं.
0 टिप्पण्या