औरंगाबाद : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर प्रथमच रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी राज्यातील सत्तांतरनाट्य, देशातील विरोधकांची भूमिका, श्रीलंकेतील अराजक आणि न्यायप्रक्रियेबाबत कायदे अभ्यासकांकडून होत असलेली चिंता आदी मुद्द्यांवर त्यांनी मते व्यक्त केली. नव्या सरकारमधील प्रमुखांकडून येत्या विधानसभा निवडणुकीत २०० जागा निवडून आणू, आदी होत असलेल्या विधानावरही त्यांनी मिश्कीलपणे भाष्य केले.
येत्या काळात राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने निवडणुका लढाव्यात, असे आपले व्यक्तिगत मत आहे. मात्र, याविषयी आपल्या पक्षातील सहकारी, शिवसेना व काँग्रेसच्या नेतृत्वासोबत कुठलीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यामधून पवार यांनी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आगामी निवडणुकांमध्ये वापरला जावा अशी इच्छा बोलून दाखवली. या प्रश्नानंतर पवार यांना नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमधील भाषणादरम्यान केलेल्या एका वक्तव्यावरुन प्रश्न विचारण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणून विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकल्यावर एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटातील ४० आमदार आणि भाजपाची युती ही नैसर्गिक युती असून भविष्यातील निवडणुकीमध्ये २०० आमदार निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला होता. शिंदे यांच्या याच वक्तव्यावरुन पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचाला. त्यावर पवार यांनी मिश्कीलपणे भाष्य केले.
एकनाथ शिंदे म्हणतायत की आम्ही २०० आमदार निवडून आणार येणाऱ्या निवडणुकीत, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “मला वाटतं त्यांचं चुकलं काहीतरी,” असं पवार म्हणाले आणि पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर पवार यांनी, “आपली २८८ ची संख्या आहे,” असं म्हटलं तेव्हा त्यांच्या बाजूला बसलेले माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंसहीत पत्रकार परिषदेतील अनेकांना हसू अनावर झालं. सर्वच्या सर्व जागा आम्हीच जिंकू असं त्यांना सांगायचं असेल पण ते आकडा चुकले असतील अशी खोचक सांकेतिक प्रतिक्रिया या वक्तव्यामधून पवार यांनी दिली.
““आमच्या लोकांना चिन्ह काय मिळणार वैगैरे चिंता सतावत होती. मी त्यांना म्हणालो आपण शिवसैनिक आहोत जिथे लाथ मारु तिथून पाणी काढू. ५० पैकी एकही आमदार पडू देणार नाही असं सांगितलं. भाजपाचे ११५ मिळून आम्ही २०० करणार. हा या सभागृहातला शब्द आहे,” असं शिंदे ४ जुलै रोजी सभागृहामध्ये दिलेल्या आपल्या भाषणादरम्यान म्हणाले होते.
0 टिप्पण्या