द्विलक्षी अर्थात बायफोकल अभ्यासक्रम हा चांगला पर्याय

बायफोकल अभ्यासक्रमने स्वयंरोजगार आणि उच्च शिक्षणही घेता येणार पुणे


अकरावीला प्रवेश घेताना स्वयंरोजगार आणि उच्च शिक्षण घेणे, असे दोन लक्ष्य साध्य करणारा द्विलक्षी वेध विद्यार्थ्यांना घ्यायचा असेल, तर द्विलक्षी अर्थात बायफोकल अभ्यासक्रम हा चांगला पर्याय आहे.

त्यातही इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्सला विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असल्याची माहिती संबंधित अभ्यासक्रमाच्या तज्ज्ञांनी दिली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अकरावी द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या साधारण साडेतीन हजार जागा उपलब्ध आहेत. अत्यंत माफक शुल्कात कौशल्य शिक्षण मिळवून व्यावसायिक अभ्यासक्रमांचा पाया पक्का करण्याची संधी द्विलक्षी अभ्यासक्रम शिकणार्‍या विद्यार्थ्यांना मिळते.


उदा. अभियांत्रिकी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा द्विलक्षी अभ्यासक्रम शिकत असताना सराव करण्याची चांगली संधी मिळाल्यामुळे त्यांचा अभियांत्रिकीचा पाया एकदम पक्का झालेला दिसून येतो. अकरावीत विद्यार्थ्यांना वैकल्पिक विषयांऐवजी बायफोकलचा विषय निवडण्याची संधी असते. त्यातच पुढील वर्षापासून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीचे गुण व सीईटीला मिळालेले गुण हे समप्रमाणात (50%) ग्राह्य धरण्यात येणार आहे. बायफोकलमध्ये मिळणारे गुण हे इतर विषयांच्या तुलनेत जास्त असतात.


कारण हे विषय नुसते सैद्धांतिक नसून त्यात प्रात्यक्षिकांवर 50 टक्के किंवा त्याहून जास्त भर दिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतात. बहुसंख्य विद्यार्थी या विषयात 90 ते 100 टक्के गुण मिळवतात. या अभ्यासक्रमामुळे कौशल्य तर प्राप्त होतेच, पण गुणांची वाढलेली टक्केवारीदेखील वाढते. राज्यात सर्वत्र खासगी आणि शासकीय संस्थांमधून हे अभ्यासक्रम राबविले जातात.


खासगी महाविद्यालयांतील फी तेथील व्यवस्थापन ठरवते, तर शासकीय तांत्रिक विद्यालयात प्रतिवर्ष 1 हजार 200 इतके माफक शुल्क आहे. घोले रोड येथील शासकीय तांत्रिक विद्यालयात फर्ग्युसन कॉलेज, आबासाहेब गरवारे कॉलेज, मॉडर्न कॉलेज , नूमवि (मुलींची) प्रशाला यांसह अन्य संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना द्विलक्षी अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळते.


व्दिलक्षी अभ्यासक्रमांतर्गत 6 वेगवेगळे ग्रुप
तांत्रिक प वाणिज्य प फलोत्पादन प शेती
मत्स्यव्यवसाय प पॅरामेडिकल


कौशल्यविकासाच्या धोरणास अनुसरून सहा वेगवेगळ्या ग्रुपमधील अभ्यासक्रम निवडल्यास विद्यार्थ्यांना भविष्यात स्टार्टअप सुरू करता येते किंवा उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. जास्त गुण मिळवणे आणि पुढील तांत्रिक शिक्षणासाठी पाया पक्का करणे, असे दोन उद्देश साध्य करणारा हा अभ्यासक्रम अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घेऊन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे.

– मंजूषा महेश पागे, पूर्णवेळ शिक्षक, शासकीय तांत्रिक


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या