‘बेझबॉल’ धोरण म्हणजे काय?; तीन दिवस पराभवच्या छायेत असणाऱ्या इंग्लंडने सामना जिंकलाच कसा?
भारताविरुद्धचा निर्णायक कसोटी सामना जिंकून इंग्लंडच्या संघाने पाच सामन्यांची मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवले आहे. एजबस्टन कसोटी सामन्यात चार सुरुवातीचे तीन दिवस पिछाडीवर असूनही यजमान संघाने शेवटी जोरदार मुसंडी मारली. सामन्यातील शेवटच्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करून भारतीय गोलंदाजी निष्प्रभ ठरवली. इंग्लंडच्या या कामगिरीमागे ‘बेझबॉल’ रणनीती असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंग्लंड क्रिकेटमध्ये आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळातदेखील हा शब्द चांगलाच चर्चेत आला आहे. ‘बेझबॉल’ या शब्दाचा थेट संबंध इंग्लंडच्या कसोटी प्रशिक्षकासोबत आहे.

साधारण दोन ते तीन महिन्यांच्या कालवधीत इंग्लंड क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले आहेत. बेन स्टोक्सची कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आले. त्याच्या जोडीला एक नवीन प्रशिक्षकही देण्यात आला. हा प्रशिक्षक म्हणजेच, न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम उर्फ बेझ. स्फोटक फलंदाज अशी ओळख असलेल्या ब्रेंडनला ‘बेझ’ या टोपण नावाने ओळखले जाते. त्याने इंग्लंडच्या संघाला जे डावपेच शिकवण्यास सुरुवात केली आहे ते ‘बेझबॉल’ नावाने प्रसिद्ध झाले आहेत.
मॅक्युलमच्या डावपेचांचा आधार घेऊन इंग्लंडच्या संघाने अगोदर न्यूझीलंडला क्लीनस्वीप दिला आणि आता भारतालाही मालिका विजयापासून रोखले. जेव्हा ब्रेंडन मॅक्युलम स्वतः क्रिकेट खेळत असे, तेव्हा तो मैदानावर येताच आक्रमक सुरुवात करत असे. न्यूझीलंडचा कर्णधार बनल्यानंतरही त्याने आपली हीच सवय कायम ठेवली. प्रशिक्षक म्हणूनही त्याने आपल्या संघाला हेच गुण शिकवले आहेत. जो रूट आणि जॉनी बेअरस्टोसारखे खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी कधीही इतके आक्रमक झाले नव्हते. मात्र, मॅक्युलम प्रशिक्षक झाल्यापासून इंग्लंडच्या सर्वच खेळाडूंनी आक्रमक खेळ सुरू केला आहे.
विशेष म्हणजे एजबस्टन कसोटीच्या पहिल्या डावात जेव्हा ऋषभ पंतने आक्रमक खेळी केली होती तेव्हा त्याच्यासाठी खेळीच्या वर्णनासाठी देखील ‘बेझबॉल’ शब्दाचा वापर झाला होता. कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळलेली असताना ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी डावाची धुरा सांभाळली. पंतने एकदिवसीय शैलीत फलंदाजी करत अवघ्या ८९ चेंडूत शतक झळकावले होते. पंतची झंझावाती खेळी बघून इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूडने त्याचे कौतुक केले होते. पंत ‘बेझबॉल’प्रमाणे क्रिकेट खेळत असल्याचे, कॉलिंगवूड म्हणाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या