औरंगाबादचे तिसऱ्यांदा नामांतर; नवे नाव छत्रपती संभाजीनगर, प्रत्यक्षात बदलाची २५ वर्षे प्रतीक्षा


औरंगाबाद
: औरंगाबादऔरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील असे नामकरण करण्याचा फेरनिर्णय तातडीच्या झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरण करण्याचा गेल्या २५ वर्षांत तिसऱ्यांदा निर्णय झाला असल्याने शहराचे प्रत्यक्ष नाव कधी बदलणार, याची प्रतीक्षा आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीतील अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील असे नामकरण करण्याचा निर्णय झाला होता. पण ही प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे कारण पुढे करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने नामांतराच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यावरून शिंदे सरकारवर चौफेर टीका झाली. शिंदे सरकार हे हिंदुत्व विरोधी असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. टीका होऊ लागल्यानेच शनिवारी सरकारी कार्यालयाला सुट्टी असतानाही तातडीची मंत्रिमंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती.

२५ वर्षे नामांतराचा घोळ

औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा निर्णय शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात १९९७ मध्ये झाला होता. सारी प्रक्रिया पूर्ण करून अधिसूचना जारी करण्यात आली होती. पण राज्य सरकारच्या त्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. राज्यात १९९९ मध्ये सत्ताबदल झाल्यावर औरंगाबादच्या नामांतराची अधिसूचना तत्कालीन विलासराव देशमुख सरकारने मागे घेतली होती. परिणामी गेली २५ वर्षे निर्णय होऊनही प्रत्यक्ष संभाजीनगर असे नामकरण झाले नव्हते. त्यावरून राजकारणही बरेच झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ३० जूनला अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचे औरंगाबादमध्ये पडसाद उमटले होते. एमआयएमने औरंगाबादच्या नामकरणाला तीव्र विरोध दर्शविला आहे. दोनच दिवसांपूर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांच्या नेतृत्वाखील एमआयएमने शहरात मोठा मोर्चा काढला होता व नामांतराला विरोध केला होता. यामुळेच नामकरणाचा हा विषय आगामी काळातही तीव्र होण्याची शक्यता आहे. १९९७ मध्ये नामकरणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला होता. पण न्यायालयाने स्थगिती दिली नव्हती, असे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

प्रक्रिया कशी असते ?

शहरांच्या नामकरणानंतर  विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये नामकरणाचा ठराव सरकारला मांडावा लागेल. त्यावर चर्चा होऊन नामकरणाचा ठराव साध्या बहुमताने मंजूर करावा लागेल. संभाजीनगर नावाला ‘एमआयएम’ वगळता कोणाचाच विरोध नसल्याने तो बहुमताने मंजूर होण्यात काहीच अडचण येणार नाही. राज्य विधिमंडळाने नामकरणाचा ठराव केल्यावर हा ठराव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सादर केला जातो. गृहमंत्रालय रेल्वे, टपाल विभाग, सव्‍‌र्हे ऑफ इंडिया अशा विविध यंत्रणांकडून ना हरकत घेतली जाते. साऱ्या यंत्रणांनी प्रतिसाद दिल्यावर गृहमंत्रालय नामकरणासाठी राज्य सरकारला मान्यता देते. त्यानंतर राज्य सरकार शहराच्या नामकरणाची अधिसूचना जारी करते.

विमानातळाला दि. बा. पाटील यांचे नाव

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ’असे नामकरण करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार साडेबारा टक्के योजनेच्या अंमलबजावणीसाठी दि. बा. पाटील यांचे योगदान आहे. त्यामुळे या विमातळास त्यांचे नाव देण्याची मागणी विविध संघटना व राजकीय पक्षांकडून करण्यात येत होती. तर तत्कालीन नगरविकास आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विमानतळास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा आग्रह धरला होता. त्याविरोधात भाजपने आंदोलनही छेडले होते .

नवे काय?

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या नामकरणावर शिंदे सरकारने पुन्हा शिक्कामोर्तब करून औपचारिकता पूर्ण केली. तसेच या नामकरणाचे श्रेय शिंदे व फडणवीस यांना मिळेल अशी व्यवस्था केली.

जुने काय?

शिवसेना-भाजप युती सरकारने १९९७ मध्ये किंवा महाविकास आघाडी सरकारने अलीकडेच संभाजीनगर असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे सरकारने छत्रपती संभाजीनगर असेच नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्राची भूमिका बदलणार..

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य सरकारची केंद्राकडून पदोपदी अडवणूक केली जात असे. आता राज्यातील सरकारमध्ये भाजप हा महत्त्वाचा घटक पक्ष असल्याने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाच्या प्रस्तावाला केंद्राकडून अडवणूक होणार नाही. महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजीनगर विमानतळ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. त्यावर गेल्या दीड वर्षांत काहीच हालचाल झाली नव्हती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या