पुणे : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या म्हणून शिवसेनेचे उपनेते व शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असा आशय आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतचे छायाचित्र आढळरावांकडून समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे. या शुभेच्छा देणं त्यांना भलतेच महागात पडले आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवूनं उद्धव ठाकरे यांनी, त्यांची शिवसेनेतून थेट हकालपट्टी केली आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात तसे जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची माहिती झाल्यानंतर आढळराव यांना जबर धक्का बसला आहे.
शनिवारी रात्री ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण झाले. पुणे जिल्ह्यातील शिवसनेचे काही पदाधिकारी आपणास रविवारी भेटण्यासाठी येत आहोत आणि स्वत: मी दोन दिवसानंतर भेटीसाठी येणार आहेत. असे यावेळी ठरले होते. या संभाषणात ठाकरे यांनी, एकनाथ शिंदे यांना दिलेल्या शुभेच्छांबद्दल विचारले होते. त्याविषयीचे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर, काही तासातच माझी पक्षातून हकालपट्टी होते, असे कसे होऊ शकते, असा मुद्दा आढळराव यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून असे पत्रक प्रसिद्धीला देण्यात आल्याची कल्पना पक्षप्रमुखांना नसावी, अशी शक्यताही आढळरावांनी व्यक्त केली. तथापि, अधिक भाष्य केले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातून सलग तीन वेळा आढळराव खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला. तेव्हापासून आढळराव आणि राष्ट्रवादीत जोरदार शीतयुध्द सुरू आहे. गेल्याच आठवड्यात पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्यासमोर त्यांनी शिवसैनिकांची खदखद मांडली होती. त्यानंतर, आता नूतन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्याचे कारण देत आढळरावांची हकालपट्टी करण्यात आली.
0 टिप्पण्या