'तो' निकाल जाहीर झाल्यानंतरच अकरावीच्या प्रवेशांची पुढील प्रक्रिया...

 सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर झाल्यावरच अकरावीच्या प्रवेशाची पुढील प्रक्रिया सुरू 



राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालक अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर झाल्यावरच अकरावीच्या प्रवेशाची पुढील प्रक्रिया सुरू होणार असल्याचे स्पष्टीकरण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहे.

राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर करून जवळपास पंधरा दिवस झाले तरी अकरावीची प्रवेश प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, यंदा प्रथमच राज्य मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल सीबीएसईच्या आधी जाहीर केला.


आयजीसीएसई आणि एनआयओएस वगळता अन्य शिक्षण मंडळांचे दहावीचे निकाल जाहीर झालेले नाहीत. दरवर्षी अकरावीच्या राज्य मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण प्रवेशांपैकी पाच टक्के विद्यार्थी सीबीएसईचे असतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी शासनाने अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईचा निकाल जाहीर होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल. ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज भाग एक भरून पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश फेरीचे वेळापत्रक आणि प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या