मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला सुरुंग लावल्यानंतर प्रत्येक दिवशी सेनेला नवा धक्का मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेतील अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची साथ सोडली आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष अक्षरश: खिळखिळा झाला आहे. हीच संधी साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेला सातत्याने लक्ष्य केले जात आहे. राज्यातील सत्तापालटापूर्वी आदित्य ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी झडत असत. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे संपलेला पक्ष आहे, अशी टिप्पणी केली होती. त्यामुळे आता ठाकरे सरकार सत्तेवरून पायउतार होताच मनसेचे नेते शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.
या सगळ्या शाब्दिक युद्धात आता मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. शालिनी ठाकरे यांनी गुरुवारी एक ट्विट केले आहे. रेल्वे इंजिन भाड्याने द्या म्हणुन उपदेश देणार्यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. आता या झोंबणाऱ्या टीकेला शिवसेना काही प्रत्युत्तर देणार का, पाहावे लागेल.
राज्यातील सत्तांतरापूर्वी राज ठाकरे यांचा मनसे पक्ष आणि भाजपमधील जवळीक वाढली होती. एकनाथ शिंदे यांनीही बंड केल्यानंतर राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. तर मनसेच्या एकमेव आमदाराने विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने मतदान केले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसे हे नेहमीच परस्परांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिले आहेत. मात्र, आता शिवसेना खिळखिळी झाल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये मनसे याचा फायदा घेऊन आपला विस्तार करणार का, हे पाहावे लागेल.
'शिवसेनेचा शेवटचा आमदार "बाबा ओरडतील" म्हणून नाही आला'
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे आमदार एकापाठोपाठ पक्षातून बाहेर पडत असतानाही मनसेने शिवसेनेवर टीका केली होती. शेवटच्या आमदाराला सुद्धा ऑफर दिली होती. पण, "बाबा ओरडतील" म्हणून नाही आला, असे ट्विट मनसे नेते अमेय खोपकर यांनी केले होते.
0 टिप्पण्या