“हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं”; एकनाथ शिंदे यांच्यासाठी अभिनेते शरद पोंक्षे यांची खास पोस्ट


मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईतील अनेक ठिकाणी भेटी देत आहेत. मंगळवारी (५ जुलै) मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिराला त्यांनी भेट दिली. तसेच श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. भर पावसातही एकनाथ शिंदे हे बऱ्याच ठिकाणी भेट देताना दिसत आहेत. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. त्याचबरोबरीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यादरम्यानचा फोटो देखील समोर आला. हा फोटो पाहून अभिनेते एकनाथ शिंदे यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत असल्याचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्याबरोबर इतर त्यांचे काही सहकारी देखील दिसत आहेत. हा फोटो शेअर करत असताना शरद पोंक्षे म्हणाले, “मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे सावरकरांना मानवंदना देण्यासाठी गेले. हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं आहे.” शरद पोंक्षे यांच्या या पोस्टला अनेकांनी पसंती दर्शवली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला आवर्जून भेट दिल्यामुळे काहींनी कमेंटच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचं कौतुक देखील केलं आहे. याआधीही शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. आपल्या आजारपणामध्ये एकनाथ शिंदे यांनी मदत केली असल्याचंही शरद पोंक्षे यांनी म्हटलं होतं. तसेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांचं अभिनंदन देखील त्यांनी केलं.

सध्या राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भर पावसातही सगळीकडे भेटी देत आहेत. शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला देखील एकनाथी शिंदे यांनी भेट देऊन त्यांना अभिवादन केलं. त्याचबरोबरीने दादर येथील चैत्यभूमी येथे उपस्थित राहून महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरपूर्वक नमन केलं. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते जेव्हा ठाण्यात आले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या