गुरु हे वाट दाखवणारे दीपस्तंभ: अजित पवार


पुणे :
समाजात आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या गुरुजनांना सन्मानित करण्याचा उपक्रम सातत्याने राबवला जातो आहे ही स्तुत्य बाब आहे. गुरु हेच वाट दाखवणारे दीपस्तंभ असतात, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

चिंतामणी ज्ञानपीठ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुजन गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चिंतामणी ज्ञानपिठाचे अध्यक्ष अप्पा रेणुसे, खासदार ॲड. वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नारायणपूर देवस्थानाचे नारायण (अण्णा) महाराज, आत्मयोगगुरु डॉ. संप्रसाद विनोद, मराठवाडा मित्र मंडळचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव आणि राष्ट्रीय जैन कॉन्फरन्स, नवी दिल्लीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पारसमल जैन (मोदी) यांना अजित पवार यांच्या हस्ते गुरुजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अजित पवार यावेळी म्हणाले, गुरुजन गौरव पुरस्कार सातत्याने 17 वर्षे होत असून या कार्यक्रमात राखलेले सातत्य निश्चितच चांगले आहे. अशा गुरुजनांच्या गौरवातून आपल्यालाही जगण्याची प्रेरणा आणि दिशा मिळते.

शर्वरी जमेनीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या गणेशवंदनेने सर्वांची दाद मिळवली. प्रास्ताविक अप्पा रेणुसे यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. विशाल तांबे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या