मुर्मू की सिन्हा? शिवसेना कुणाला पाठिंबा देणार? संभ्रम कायम, पण राऊतांनी मुर्मूंना पाठिंब्याचे दिले संकेत!


राज्यातील सत्तानाट्य काहीसं थंड होत असताना आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. एकीकडे भाजपानं द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जाहीर केलेली असताना दुसरीकडे भाजपविरहीत पक्षांचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा उभे राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणते पक्ष कुणाला पाठिंबा देणार? यावरून चर्चा सुरू असतानाच शिवसेनेच्या खासदारांनी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनाच पाठिंबा देण्याची मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्यामुळे पेच निर्माण झाला होता. मात्र, आता उद्धव ठाकरेंनी देखील द्रौपदी मुर्मूंनाच पाठिंबा देण्याची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊतांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात संकेत दिले आहेत.

उद्धव ठाकरेंची खासदारांशी चर्चा!

सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी आणि सर्व खासदारांशी चर्चा केली. यावेळी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका खासदारांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडली असून त्यानुसार निर्णय घेण्याची विनंती केली असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे.

“बाळासाहेब शिवसेनाप्रमुख होत असतानाही अशा विषयांवर नेत्यांची बैठक होत असत. सहकाऱ्यांची मतं जाणून घेऊन निर्णय घेतले जायचे. आत्ताच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीबाबत कालच्या बैठकीत चर्चा केली. द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीवर देखील चर्चा झाली. द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला म्हणजे तो भाजपाला पाठिंबा होत नाही. यशवंत सिन्हा यांच्यासोबतही आमच्या सद्भावना आहेत. अशावेळी लोकभावना पाहून निर्णय घ्यावा लागतो. यापूर्वीही प्रतिभाताई पाटील यांना आम्ही पाठिंबा दिला होता. एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नव्हता. आम्ही प्रणव मुखर्जींनाही पाठिंबा दिला होता”, असं संजय राऊत म्हणाले.

लवकरच उद्धव ठाकरे स्पष्ट करणार भूमिका

“पक्षप्रमुख आज-उद्या भूमिका स्पष्ट करतील. पक्षप्रमुख कोणत्या दबावाखाली निर्णय घेत नाहीत. आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही निर्णय घ्या. त्यांचा निर्णय आमदार-खासदारांना बंधनकारक असेल”, असं देखील संजय राऊत म्हणाले.

श्रीकांत शिंदे, भावना गवळी अनुपस्थित

दरम्यान, कालच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंचं चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे आणि नुकत्याच लोकसभेतील प्रतोदपदावरून हटवण्यात आलेल्या खासदार भावना गवळी हे दोघे गैरहजर असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं आहे. “खासदार फुटण्याच्या तयारीत अशा बातम्या बाहेर पसरल्या आहेत. पण काल बहुसंख्य खासदार उपस्थित होते. एकनाथ शिंदेंचे चिरंजीव आणि भावना गवळी उपस्थित नव्हत्या”, असं राऊत म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या