राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष झाल्याचं पहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याच्या पवारांच्या मागणीवर बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या काळातील मदतीबद्दल भाष्य केल्यानंतर अजित पवारांनी फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.
पूर आणि अतिवृष्टीसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आल्यानंतर फडणवीस यांनी एक आठवड्यानंतर ही मदत दिली जाईल अशी माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी यांनी नुकसानीचा अंदाज घेतला, तेव्हा ५० टक्के पंचनामे झाले होते. उर्वरित पंचनामे आठवडाभरात झाल्यावर मदतीचा निर्णय होईल. महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टी, चक्रीवादळग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेण्यास सात महिन्यांचा अवधी लावला आणि केंद्र सरकारकडे बोट दाखवत राहिले. आम्ही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवू. पण केंद्राच्या निर्णयाची वाट न पाहता राज्याच्या निधीतून पूरग्रस्तांना व आपत्तीग्रस्तांना मदत दिली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टी असो, दुष्काळ असो चक्रीवादळ असो सात सात महिने त्यांच्या सरकारच्या काळामध्ये मदत मिळालेली नाही, असा टोलाही फडणवीस यांनी थेट कोणाचाही उल्लेख न करता लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केलेल्या या विधानासंदर्भात आज अजित पवार यांना पत्रकारांनी नागपूरमध्ये प्रश्न विचारला असताना अजित पवार यांनी “आम्हाला प्रश्न विचारुन जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत” असा टोला फडणवीस यांना लगावला.
“मराठवाडा विदर्भ महाराष्ट्राच्या इतर भागातील अतिवृष्टीमुळे शेतकरी व्याकूळ झालेला आहे. आत्महत्या करतोय. ही गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही काहीतरी सांगितलं की मग तुम्ही नव्हते का सात महिने आणि पाच महिने करत वगैरे बोलणं चुकीचं आहे. हे काही समस्येवरील उत्तर नाही. त्यांचे पंचनामे कसे ताबडतोब सुरु होतील, मदत कशी लवकर मिळेल अशी उत्तरं दिली पाहिजेत. त्यांना दुबार पेरणी करायची असेल तर बियाणं परत कसं मिळेल हे त्याचं उत्तर पाहिजे. या समस्यांचं कोणी बोलतच नाही,” असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या