औरंगाबाद : शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, अभियंत्यांप्रमाणे संकल्पना व गणितीय सूत्राधारित विचारशैली (स्टेम) विकसित करण्यासाठी आणि तंत्रज्ञानाविषयीची भीती घालवण्याच्या उद्देशाने केंद्राच्या नीती आयोगाअंतर्गत अटल टिंकरिंग प्रयोगशाळा सुरू करण्यात येत आहेत. राज्यात ५४५ शाळांमध्ये या टिंकरिंग प्रयोगशाळांना मान्यता मिळालेली आहे. देशात सहा हजार ३८ अटल प्रयोगशाळांना मान्यता मिळालेली असून यामधील संख्येत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक उत्तरप्रदेश (७२९) तर त्या खालोखाल तामिळनाडू (७६१) व कर्नाटकला (५७९) प्रयोगशाळा मिळालेल्या आहेत.
या प्रयोगशाळांमधून त्रिमितीय छपाई, कृत्रिम प्रज्ञातंत्रज्ञान (आर्टिफिशल इंटेलिजन्स), रोबोटिक, विज्ञानाधारित नवतंत्रज्ञानाशी विद्यार्थ्यांना अवगत करणे. स्टेम अर्थात सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग व मॅथ्सच्या माध्यमातून नवउद्यमी, कौशल्यज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने मदत करण्याचा उद्देश आहे. जपानमधील मुलांप्रमाणे स्वनिर्मित वस्तूंचा विचार रुजवण्यासाठी अटल टिंकरिंग प्रयोगशाळांचा उपयोग होणार आहे. विशेष म्हणजे एखाद्या संस्थेला मान्यता मिळालेल्या प्रयोगशाळेत अन्य परिसरातील शाळांनाही भेट देता येणार आहे. या प्रयोगशाळेत विशिष्ट इयत्तेच्या मुलांना प्रवेश, असा काही नियम नाही, अशी माहिती अभ्यासकांकडून मिळाली. विद्यार्थ्यांमध्ये शालेय स्तरावरच तंत्रकौशल्य निर्माण व्हावे, या विचारातून अटल टिंकरिंग प्रयोगशाळेत इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, रोबोटिक्सची माहिती शिकवण्यात येणार आहे. गर्दीतील नेमकी संख्या मोजण्यासारख्या तंत्रातून मुलांमध्ये विज्ञानाविषयीचे आकर्षण निर्माण करून तांत्रिक वस्तूंशी खेळताना नवसंकल्पना निर्माणाच्या दृष्टीने अटल टिंकरिंग प्रयोगशाळांचा उपयोग महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे अंबाजोगाईतील खोलेश्वर विद्यालयातील शिक्षक मोरेश्वर देशपांडे यांनी सांगितले.
राज्यातील प्रयोगशाळांची संख्या
राज्यासाठी मंजूर झालेल्या ५४५ प्रयोगशाळांच्या संख्येपैकी निम्यांपर्यंत पुणे (३६), कोल्हापूर (६५), सांगली (४५), सातारा (४१), सोलापूर (१८) व अहमदनगर (४६) या जिल्ह्यांमध्ये आहेत. मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक बीड (३६) जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल लातूर (२३), औरंगाबाद (९), जालना व नांदेड प्रत्येकी ४, परभणी ६, उस्मानाबाद ५ तर हिंगोलीला २ प्रयोगशाळा मंजूर झाल्या आहेत. पूर्व व पश्चिम विदर्भाला एकूण ९१ तर कोकणातील तीन जिल्ह्यांमध्ये २२, नाशिक (३४), जळगाव (८), धुळे (५), नंदूरबार (४), मुंबई शहर (९), उपनगर (६), ठाणे (१२) जिल्ह्याला प्रयोगशाळा मिळाल्या आहेत. दरम्यान, औरंगाबाद विभागातील काही शाळांमध्ये अटल टिंकरिंग प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्याची माहिती शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी दिली.
सरस्वती भुवनाला एकूण पाच अटल टिंकरिंग प्रयोगशाळा मिळाल्या आहेत. त्यातील तीन सुरू झाल्या आहेत. तर दोन या सत्रापासून सुरू होतील. आणखी दोन प्रयोगशाळा मंजूर झालेल्या आहेत. एकूण निधी २० लाखांचा आहे
0 टिप्पण्या