“सेलिब्रिटींनी प्रक्षोभक विधाने केली नाहीत तर…”, देशातील वाढत्या तणावावर मकरंद देशपांडेंचा सल्ला


मकरंद देशपांडे हे बॉलीवूड आणि थिएटरमधील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. मकरंद अनेकदा चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका करतात पण त्यांची ती भूमिका लोकांच्या नेहमीच लक्षात राहते. शाहरुख खानच्या ‘स्वदेस’मधली भूमिका असो किंवा आमिर खानच्या ‘सरफरोश’मधील छोटी भूमिका असो किंवा मग RRR मधील त्यांची भूमिका असो, मकरंद देशपांडे हे नेहमीच आपली छाप सोडतात. मकरंद देशपांडे यांनी प्रत्येक जॉनरा आणि प्रत्येक भाषेत काम केले आहे. आता ते OTT वर ‘शूरवीर’ ही त्यांची नवी वेब सीरिज घेऊन येणार आहेत. या वेब सीरिजमध्ये मकरंद देशपांडे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत मकरंद यांनी देशातील वाढत्या तणावावर वक्तव्य करत सेलिब्रिटींना सल्ला दिला आहे.

मकरंद यांनी नुकतीच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली होती. यावेळी कलाकार, सेलिब्रिटी किंवा सामान्य माणसाने अशा परिस्थितीत काय करावे? असा प्रश्न विचारला होता. “अशा परिस्थितीत आपण शहाणपणाने वागले पाहिजे. कारण आपण त्यावर प्रक्षोभक विधाने केली नाहीत तर त्या गोष्टीचे महत्त्व कमी होऊन आपोआप विस्मरणात जाईल. जर आपल्यामध्ये ती क्षमता आहे की आपण जे बोलू ते हेडलाइन होईल, तर ते न होण्यासाठी प्रयत्न करा. बातम्यांच्या हेडलाइन या नेहमी विध्वंसकच असतात. कायदा आणि सुव्यवस्था काय करत आहे यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करूया. आपण शांतता रहावी यासाठी काम करायला हवे. आपण सगळे एक आहोत, एकच राहू. आपण हिंदुस्तानी आहोत आणि हिंदुस्तानीच राहू”, असे मकरंद देशपांडे म्हणाले.

‘शूरवीर’ ही वेबसीरिज १५ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. मकरंद देशपांडे व्यतिरिक्त मनीष चौधरी, रेजिना कॅसांड्रा, आदिल खान, अभिषेक साहा, अंजली बारोट, कुलदीप सरीन, आरिफ झकारिया, फैसल राशिद, साहिल मेहता आणि शिव्या पठानी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या