नवी दिल्ली : अनुभवी क्रीडा प्रशासक निरदर बात्रा यांनी सोमवारी आंतरराष्ट्रीय हॉकी संघटना (एफआयएच) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) सदस्यत्वही सोडले.
बात्रा यांना ‘हॉकी इंडिया’चे आजीवन सदस्यत्व देण्यात आले होते. याच्या आधारेच त्यांनी २०१७मध्ये ‘आयओए’च्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि जिंकली होती. परंतु राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार, बात्रा यांना ‘हॉकी इंडिया’चे आजीवन सदस्यत्व मिळणे बेकायदेशीर असल्याचा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने २५ मे रोजी दिला होता. त्यानंतर त्वरित त्यांना ‘आयओए’च्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. बात्रा यांना ‘आयओए’च्या अध्यक्षपदाच्या आधारेच ‘आयओसीचे’ सदस्यत्व मिळाले होते. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालानंतर बात्रा यांनी आपण आगामी ‘आयओए’ निवडणुका लढवणार नसल्याचे म्हटले होते, मात्र त्यावेळी त्यांनी जागतिक हॉकी संघटनेचे अध्यक्षपद सोडण्यास नकार दर्शवला होता, परंतु सोमवारी त्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला.
बात्रा यांनी ‘आयओए’, ‘आयओसी’ आणि ‘एफआयएच’ यांना स्वतंत्र पत्र लिहून आपण आपल्या पदावरून पायउतार होत असल्याची माहिती दिली. ‘‘वैयक्तिक कारणांस्तव मी ‘एफआयएच’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे,’’ असे बात्रा यांनी ‘एफआयएच’च्या कार्यकारी मंडळाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
‘‘वैयक्तिक कारणांस्तव, मी अध्यक्षपदारून पायउतार होण्याचा निर्णय घेत आहे. २०१७ सालापासून हे पद भूषवताना तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आभार,’’ असे बात्रा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारी मंडळातील सदस्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले.
अशाच प्रकारचा संदेश त्यांनी ‘आयओसी’चे अध्यक्ष थॉमस बाख यांना लिहिलेल्या पत्रातही होता. बात्रा यांची २०१९मध्ये ‘आयओसी’चे सदस्य म्हणून निवड झाली होती. तसेच त्यांची मे २०२१मध्ये ‘एफआयएच’च्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा नियुक्ती झाली होती.
बात्रा यांच्या कार्यालयांवर ‘सीबीआय’ची छापेमारी
बात्रा यांच्या दिल्ली आणि जम्मू येथील पाच कार्यालयांवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी छापेमारी केली. बात्रा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी एप्रिलमध्ये प्राथमिक चौकशीलाही सुरुवात करण्यात आली होती. ‘हॉकी इंडिया’ संघटनेला देण्यात आलेल्या निधीपैकी ३५ लाख रुपये बात्रा यांनी स्वखर्चासाठी वापरल्याचा दावा करण्यात आला होता, असे ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबाबत प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केल्यानंतर ‘सीबीआय’कडून छापेमारी करण्यात आली.
0 टिप्पण्या