पावसाचा जोर ओसरला; कोकणासह, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता


पुणे :
राज्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत द्रोणीय पट्टा कायम आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

राज्याच्या किनारपट्टीवरील कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातून मोठय़ा प्रमाणावर बाष्पाचा पुरवठा होत असल्याने जुलैच्या सुरुवातीला दक्षिण कोकणातून सुरू झालेला पाऊस गेल्या दहा ते बारा दिवसांत संपूर्ण राज्यात बरसला. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही काही भागांत त्याने धुमाकूळ घातला.

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्याचप्रमाणे या काळात शेतीमालाचेही नुकसान झाले. मात्र सध्या राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. मात्र गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगतचा द्रोणीय पट्टा कायम आहे. त्यामुळे कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गेल्या २४ तासांत कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी आणि विदर्भात मेघगर्जनेसह बऱ्याच ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी पाऊस पडला. 

अंदाज काय?

पुढील चोवीस तासांत कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसर आणि जोरदार वारे तसेच विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी मुसळादर तर विदर्भात बहुतंश ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या