Breaking News

रेशीम उद्योग वाढीसाठी शासनाची प्रोत्साहन योजना

 पुणे 

शेतीबरोबरच शेतकर्‍यांना जोड उद्योगासाठी पूरक ठरत असलेला रेशीम उद्योग राज्यात चांगलाच जोर धरू लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यातील पुणे विभागातील बारा जिल्ह्यांमध्ये 2 हजार 640 एकरांवर तुतीची लागवड होत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ही लागवड दुप्पट असून, यामुळे रेशीम उद्योग वाढण्यास सहकार्य मिळणार आहे. दरम्यान राज्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यात 730 एकरांवर तुतीची लागवड झाली आहे. राज्य शासनाच्या रेशीम संचालनालयाच्या वतीने शेतकर्‍यांना तुती लागवडीबरोबरच कीटक संगोपनगृह उभारण्यासाठी प्रोत्साहनात्मक योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये 'मनरेगा' आणि 'सिल्क समग्र योजना-2' या दोन योजनांचा समावेश करण्यात आला आहे.


या योजनेच्या माध्यमातून एकरी तीन वर्षांसाठी शेतकर्‍यांना 3 लाख 39 हजार 782 रुपयांचे अनुदान देण्यात येते. राज्याच्या पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, जळगाव, धुळे, नाशिक, नगर, नंदुरबार, ठाणे या बारा जिल्ह्यांत यावर्षी तुती लागवडीचे उद्दिष्ट 1 हजार 600 एकर एवढेच होते. मात्र त्यामध्ये वाढ होऊन ते 2 हजार 640 एकरांपर्यंत पोहचले आहे. सध्या एक किलो रेशमाला किमान 660 किलो भाव मिळत आहे. कर्नाटकमधील रामनगर बाजारपेठेत सर्वाधिक भाव मिळत आहे. तर राज्यात बारामती, जालना, जयसिंगपूर (कोल्हापूर) या शहरांत असलेल्या कृषी उत्पन्न बाजारपेठेतही गेल्या काही वर्षापासून शेतकर्‍यांकडून रास्त भावात रेशीम विकत घेतले जात आहे.


याशिवाय काही व्यापारी शेतकर्‍यांच्या बांधावरच रेशीम खरेदी करीत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. त्यामधूनदेखील शेतकर्‍यांना किलोस किमान सहाशे रुपये भाव मिळत आहे. पुणे प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या अधिकारी डॉ. कविता देशपांडे म्हणाल्या, 'पुणे विभागातील बारा जिल्ह्यांमधील शेतकरी मागील काही वर्षापासून रेशीम उद्योगाकडे वळू लागला आहे. हा उद्योग सहजसोपा आहे. त्यामुळे गृहिणी, वृद्ध हे देखील या उद्योगात कार्यरत आहेत. या उद्योगासाठी एकरी किमान पाच ते साडेपाच हजार रोपांची लागवड करावी लागते. रेशीमला भावदेखील चांगला मिळतो.'


गतवर्षी एक हजार 600 एकरांवर लागवड
पुणे प्रादेशिक रेशीम कार्यालयाने मागील वर्षी 1 हजार 600 एकरांवर (बारा जिल्ह्यांत) तुती लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यामधील एक हजार एकरांवर लागवड पूर्ण झाली आहे.


Post a Comment

0 Comments