तक्रारी करूनही दखल न घेतल्याने स्वतः उचलला कचरा
श्रीरामपूर:
शहरातील शिरसाट एक्सिडेंट हॉस्पिटल समोरील कचरा उचलण्या बाबत गेल्या एक महिन्यापासून तक्रार करूनही नगरपालिका प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर नगराध्यक्षा तथा साईबाबा संस्थानच्या विश्वस्त अनुराधाताई आदिक यांनी आज भल्या सकाळीच येथील कचरा उचलून साफ सफाई केली. काही वेळानंतर पालिकेचे ठेकेदार यांना माहिती मिळताच त्यांनी या कामात हातभार लावला.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे आजार वाढू नये म्हणून प्रशासनाने काळजी घेत असताना राज्यभर स्वच्छ सर्वेक्षण अभियान चालू आहे. मात्र येथील नगरपालिका प्रशासन कचराउचलण्याबाबत नेहमीच उदासीन दिसून येते. शिरसाट एक्सिडेंट हॉस्पिटल परिसरात गेल्या महिन्यापासून तेथील नागरिक प्रोमोद संघवी व इतरांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार करून देखील प्रशासनाने दखल न घेतल्याने नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक या आज भल्या सकाळीच कचरा उचलत असताना पालिकेचे कचरा ठेकेदार सुपरवायझर व कर्मचाऱ्यांनी येऊन कचरा साफ करण्यास सुरुवात केली. महिनाभरापासून पडलेला सर्व कचरा नगराध्यक्ष आदिक यांनी स्वतः उभे राहून साफ करून घेतला.
नगराध्यक्षा आदिक यांच्यासह डॉ. दिलीप शिरसाट, सागर कुऱ्हाडे, निरजन भोसले, अर्जुन आदिक, कचरा ठेकेदाराचे सुपरवायझर सुरज माळी, नवनाथ पवार, आकाश शिंदे,आदींनी कचरा उचलण्यासाठी सहकार्य केले.
याबाबत परिसरातील डॉ. दिलीप शिरसाट, सागर कुऱ्हाडे, निरजन भोसले, अनील संघवी, अजित बाबेल, प्रमोद संघवी आदी नागरिकांनी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांना धन्यवाद आभार मानले.
सध्या सर्वत्र पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी कचरा हा घंटागाडीचा टाकावा रस्त्यावर व इतर ठिकाणी टाकू नये त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती असते शहरांमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा असतो याबाबत नगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्व भागातील कचरा उचलण्याची दक्षता घ्यावी असे आवाहनही नगराध्यक्ष आदिक यांनी केले आहे.
0 टिप्पण्या