पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून कोसळणारा पाऊस ओसरला आहे. परिणामी खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग मंगळवारी सकाळी पूर्णपणे थांबविण्यात आला आहे. चारही धरणांमधील पाणीसाठा १८.८९ अब्ज घनफूट (टीएमसी) ६४.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात २० मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ३७ मि.मी, पानशेत धरण परिसरात ३२ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात अवघ्या सहा मि.मी पावसाची नोंद झाली. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात १८.८९ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. सोमवारी रात्री चारही धरणांत १८.५८ टीएमसी पाणीसाठा होता. सोमवारी रात्रीच्या तुलनेत मंगळवारी सकाळी ०.३१ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, बुधवारपासून (१३ जुलै) खडकवासला धरण परिसरात तुलनेने पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे या धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग टप्याटप्याने कमी करण्यात आला आहे. रविवारी या धरणातून मुठा नदीत २९९६ क्युसेक वेगाने मुठा नदीत विसर्ग करण्यात येत होता. सोमवारी दिवसभर या धरणातून १७१२ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग पुर्णपणे थांबविण्यात आला आहे. सध्या नवीन मुठा कालव्यातून १००५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत
टेमघर १.९२ ५१.८८
वरसगाव ७.८१ ६०.५५
पानशेत ७.१७ ६७.६८
खडकवासला १.९७ १००.००
एकूण १८.८९ ६४.७९
0 टिप्पण्या