“विचार बदलला म्हणून काय ठार माराल? शांत आहे म्हणजे…”; गाडीवरील हल्ल्यानंतर उदय सामंतांचा सूचक इशारा


शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केला. दगडफेकीत सामंत यांच्या कारची काच फुटली. कात्रज भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमासाठी आले होते. कात्रज भागात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा मंगळवारी रात्री पार पाडली. शिंदे यांच्यासह सामंत आले होते त्यावेळीच हा हल्ला झाला. मात्र आता या हल्ल्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर सामंत यांनी थेट शिवसेनेला इशारा दिलाय. सामंत यांनी ट्विटरबरोबरच एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना हा इशारा दिला आहे.

सामंत यांनी ट्विटरवरुन “गद्दार म्हणता तरी शांत आहे. शिव्या घालता तरी शांत आहे. आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे. लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही. काळ ह्याला उत्तर आहे. अंत पाहू नका,” असं ट्विट केलं आहे.

शिवसेनेच्या नेत्यांची वेगवेगळी भूमिका…

असा हल्ला करणारा माझा एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता असता तर मी कारवाई करायला सांगितली असती असंही सामंत यांनी या हल्ल्यासंदर्भात एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. तसेच निलम गोऱ्हे, सुभाष देसाई यासारख्या नेत्यांनी या हल्ल्यावर दिलेल्या प्रतिक्रियांचा संदर्भ देत सामंत यांनी शिवसेनेच्या नेत्यांची या हल्ल्यासंदर्भात वेगवेगळी भूमिका आहे याबद्दल मला काही बोलायचं नाही, असं म्हटलंय.

एकीकडे मुख्यमंत्री अशी भूमिका मांडत असताना दुसरीकडे

या हल्ल्यानंतर आपण पुण्यातील पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. माझी, माझ्या कारच्या चालकाची आणि खासगी सचीवाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. सामंत यांनी यावेळी एखाद्याचा विचार पटला नाही तर ठार मारण्यासारखी टोकाची भूमिका घेणे काही योग्य नाही, असंही म्हटलं. तसेच या हल्ल्याच्या निमित्ताने सोज्वळ चेहऱ्यामागे काय चाललंय हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्याचा टोलाही सामंत यांनी लगावला. “काल हा हल्ला झाला. त्या दिवशी दुपारीच मुख्यमंत्री शिंदे यांनी एका कार्यक्रमात कोणीही काहीही बोललं तरी आपण विकासाच्या कामातून उत्तर द्यावे असं म्हटलं होतं. एकीकडे मुख्यमंत्री अशी भूमिका मांडत असताना दुसरीकडे त्याच दिवशी माझ्यावर हल्ला झाला,” असं म्हणत सामंत यांनी टीका केली.

हल्लेखोरांचे चेहरे पाहिले का?

कोणावर हल्ला करायचा होता, असा प्रश्न सामंत यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सामंत यांनी, “मी कार्यक्रमातून निघाल्यापासून काही गाड्या माझ्या ताफ्याच्या मागे होत्या. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत ही हे घडू शकलं असतं अशी मी शक्यता व्यक्त केली. मात्र हे असं का होतं याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे, मी त्यांना यासंदर्भातील विनंती करतो,” असंही सामंत म्हणाले. हल्लेखोरांचे चेहरे पाहिले का? असा प्रश्न विचारण्यात आला असता सामंत यांनी, “दोन ते तीन व्यक्ती होत्या. काळे आणि पांढरे कपडे घातलेले लोक होतं. सर्व काही सीटीटीव्हीमध्ये कैद झालं आहे,” असं म्हटलं.

एका शाखाप्रमुखाला मुख्यमंत्री केल्याची भूमिका घेतली याचा पोटशूळ

“ज्या नेत्याची सभा होती त्याने काठ्या देण्याची भाषा केलेली. एकीकडे हुकूमशाही म्हणायचं आणि दुसरीकडे हे असं. जर काही अघटीत घडलं असतं तर माझ्या आई वडिलांची प्रतिक्रिया घ्यावी लागली असती की मुलाबद्दल काय वाटतं. मीच शहाणा, मीच मोठा, माझ्या मतदारसंघात मी सांगेन तेच होईल वगैरे असं चालणार नाही. ही अशी विचारसणी नाशवंत आहे. जे जे कोणी येऊन वक्तव्यं करत आहेत ती वक्तव्यं पाहा. एक म्हणतो अभिमान आहे, एक म्हणतो संबंधच नाही, एक पदाधिकारी घाणेरड्या शिव्या घालतो. आम्ही काय केलं आहे? एका शाखाप्रमुखाला मुख्यमंत्री केल्याची भूमिका घेतली याचा पोटशूळ उठलाय. आम्ही शांत आहोत याचा अर्थ असहाय्य आहोत असं नाहीय. आमच्यावर आई-वडिलांचे संस्कार आहेत. आम्ही महाराष्ट्रातील राजकारणाचे संस्कार जपतो,” असंही सामंत यांनी म्हटलंय.

येणाऱ्या निवडणुकीत लोक उत्तर देतील

“मी पण जाऊन सांगू शकतो याला मारा त्याला मारा पण मी हे सांगणार नाही. चिथवण्यापेक्षा सुभाष देसाईंनी तोडण्यापेक्षा जोडण्याची गरज होती. त्यांच्यावर हल्ले करमार असणार तर येणाऱ्या निवडणुकीत लोक उत्तर देतील,” असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

नेमकं घडलं काय?

सामंत कात्रज चौकातून कारने जात असताना शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आणि सामंत यांची कार अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गर्दीत एकाने सामंत यांच्या कारवर दगड फेकल्याने काच फुटली. सामंत यांच्या कारवर हल्ला झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसैनिकांनी सामंत यांच्या कारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने सामंत यांच्या कारला वाट करुन दिली. या घटनेमुळे कात्रज चौकात तणावाचे वातावरण होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या