राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायमच चर्चेत असतात. पण त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची जास्तच चर्चा असते. त्या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. बँक अधिकारी, गायिका अशी ओळख असलेल्या अमृता फडणवीस यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. नुकतंच अमृता फडणवीस यांनी झी मराठीवरील ‘बस बाई बस” या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
झी मराठीच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, दुसऱ्या भागात अभिनेत्री अमृता खानविलकर सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आता तिसऱ्या भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस हजेरी लावली. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो झी मराठीने शेअर केले आहेत.
यात विविध गंमतीजमती पाहायला मिळत आहे. यावेळी अमृता फडणवीसांना विविध राजकीय घटनांसह खासगी आयुष्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. त्यासोबत त्यांनी गाण्याची आवड, जेवण आणि ट्रोलिंग यावरही उत्तर दिलखुलासपणे उत्तरं दिली. या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस यांना लपून तुम्ही खरेदी करता का? असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर अमृता फडणवीस यांनी कधीच नाही असे लिहिलेला बोर्ड उचलत मी लपून खरेदी करत नाही. असे सांगितले. त्यासोबत मी काय घाबरते त्यांना, असेही त्यांनी म्हटले. अमृता फडणवीसांच्या या उत्तरावर प्रेक्षकांनी खळखळून हसत दाद दिली. तर सुबोध भावे यांनीही हसत त्याला प्रतिसाद दिला. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होत आहे. यावर विविध प्रतिक्रियाही उमटत असल्याचे दिसत आहे.
0 टिप्पण्या