जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम कधी करणार? महाराष्ट्र ‘अंनिस’चा शासनाला सवाल


“महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर तेव्हाच्या सरकारने जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात तीन वेळा सरकार बदलले. पण, कायदा निर्माण झाल्यावर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अपेक्षित नियम करण्यासाठी अजून कोणत्याही सरकारला वेळ झाला नाही, ही अत्यंत खेदाची बाब असून नवीन सरकार तरी हे नियम करणार का?” असा सवाल महाराष्ट्र अंनिसमार्फत मुक्ता दाभोलकर आणि डॅा. हमीद दाभोलकर यांनी केला आहे.

राज्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये म्हैसाळ येथील नऊ जणांचे हत्याकांड, सातारा येथील गुप्तधनाच्या लालसेमधून झालेल्या नरबळीचा छडा लागणे, पुणे येथील गुप्तधनासाठी बळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना अटक, नागपूर येथील पाच वर्षाच्या बालकाचा भुताने झपाटले आहे म्हणून नातेवाइकांनी मारहाण केल्याने झालेला मृत्यू अशा मानवतेला काळीमा फासणाऱ्या अंधश्रद्धा विषयक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याचा प्रमुख भाग म्हणून जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तातडीने तयार करावेत अशी अपेक्षा दाभोलकर यांनी व्यक्त केली आहे.

शासनाच्या वतीने जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणीसाठी पुरेसे प्रयत्न होत नसले तरी महाराष्ट्र अंनिस आणि सजग नागरिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रात गेल्या नऊ वर्षात एक हजारहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. लोकांचे शोषण करणाऱ्या सर्व धर्मातील बाबा-बुवांनाही शिक्षा झाली आहे, असे महाराष्ट्र अंनिस कार्यकारी समिती सदस्य नंदिनी जाधव आणि मिलिंद देशमुख यांनी सांगितले.

बातम्या आणि लेखांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन –

ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्क आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन (२० ऑगस्ट) हा ‘राष्ट्रीय वैद्यानिक दृष्टिकोन दिवस’ म्हणून पाळला जातो. अंधश्रद्धा निर्मूलन आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संबंधात गेल्या नऊ वर्षांत वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांचे श्रीपाल ललवाणी यांनी केलेल्या संकलन प्रदर्शनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनिस यांच्या हस्ते शनिवारी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी सहा वाजता महाराष्टातील संत, समाजसुधारकांची परंपरा आणि अंधश्रध्दा निर्मूलनाची चळवळ या विषयावर साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे हे डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्यान पुष्प गुंफणार असून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे या वेळी उपस्थित राहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या