पुणे : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) पुणे विभागांतर्गत सिंहगड आणि अक्कलकोट ही दोन निवासस्थाने वर्षभरानंतरही बंदच आहेत. सिंहगड येथील निवासस्थानाचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. एमटीडीसी पुणे विभागाकडून मात्र, पाणी, वीज आणि अपुरे बांधकाम अशा तांत्रिक कारणांमुळे दोन्ही निवासस्थाने अद्यापही सुरू करण्यात आली नसल्याचे कारण देण्यात येत आहे.
पर्यटन महामंडळाच्या पुणे विभागांतर्गत महाबळेश्वर, पानशेत, माथेरान, माळशेज, कार्ला, भीमाशंकर आणि कोयनानगर अशी सात निवासस्थाने होती. त्यामध्ये गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात सिंहगड आणि अक्कलकोट या दोन निवासस्थानांची भर पडल्याने महामंडळाच्या पुणे विभागांतर्गत एकूण नऊ निवासस्थाने झाली आहेत. सिंहगड निवासस्थान हा बंगला पूर्वी रेव्हेन्यू वेल्फेअर असोशिएशनचा साधा बंगला होता. त्याच्या खोल्या देखील सध्या होत्या. यापूर्वी हा पूर्वी बंगला भाडेतत्वावर दिला होता. गेल्या वर्षी त्याचे नूतनीकरण करण्यात आले. गडावर पर्यटनची ३२ गुंठे जागा आहे. या जागेवर महामंडळाकडून पर्यटक निवास बांधण्यात आले होते. राज्य सरकारच्या पर्यटनच्या नवीन धोरणानुसार पर्यटक निवासाची दुरुस्ती आणि श्रेणीवाढ करणे आवश्यक होते. त्यानुसार, पर्यटक निवासांची कामे महामंडळाने केली आहेत. या पर्यटक निवास इमारतीची श्रेणीवाढ करताना अस्तित्वातील इमारतीमध्येच दोन सूट, एक व्हीआयपी सूट, एक लोकनिवास (डॉरमेटरी), व्यवस्थापक कक्ष, उपाहारगृह आणि डायनिंगची सुविधा केली आहे. दोन सूट, व्हीआयपी सुट वातानुकूलित केला आहे. सुटमध्ये आकर्षक सिलींग, आधुनिक फर्निचर बनविले असून आधुनिक स्वच्छतागृह केले आहे. या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी अशा दोन लोकनिवास (डॉरमेटरी) आहेत. एका वेळी प्रत्येकी आठ पर्यटक येथे राहू शकतात.
दरम्यान, अक्कलकोट येथील निवासस्थानात सात खोल्या असून निवासस्थानाची अंतर्गत कामे अर्धवट आहेत. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय निवासाचे पर्यटन महामंडळाचे हे निवासस्थान तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे. या निवासस्थानाच्या आजुबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य झाले आहे.
शासनाकडे पाठपुरावा सुरू –
“१३ ऑगस्टपासून लागून आलेल्या सुट्यांमुळे पुणे विभागातील महामंडळाची निवासस्थाने ८० टक्के आरक्षित झाली आहेत. पुणे विभागातील एकूण निवासस्थानांपैकी सिंहगड आणि अक्कलकोट ही दोन निवासस्थाने अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. सिंहगड येथील निवासस्थानी वीज आणि पाण्याची समस्या आहे. या समस्यांचे निराकरण करण्याची कार्यवाही सुरू आहे. तर, अक्कलकोट येथील निवासस्थानाचे बांधकाम अद्याप अर्धवट आहे. परिणामी ही दोन निवासस्थाने अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. दोन्ही निवासस्थाने लवकरात लवकर सुरू करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.” अशी माहिती एमटीडीसी पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक मौसमी कोसे यांनी दिली.
0 टिप्पण्या