बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : गुकेशचा शिरॉव्हवर धक्कादायक विजय ; भारत-ब संघाचा ; सलग पाचवा विजय


महाबलिपूरम : युवा भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या पाचव्या फेरीत अ‍ॅलेक्सी शिरॉव्हवर धक्कादायक विजयाची नोंद केली. या बळावर भारत-ब संघाने मंगळवारी खुल्या गटात स्पेनला २.५-१.५ असे नामोहरम केले.

अप्रतिम रणनीतीमुळे गुकेशने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सलग पाचव्या विजयाची नोंद करताना भारत-ब संघाच्याही सलग पाचव्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. या विजयानिशी गुकेशने लाइव्ह रेटिंगमध्ये विदित गुजरातीला मागे टाकले. बी. अधिबाननेही दिमाखदार कामगिरी करताना ग्रँडमास्टर एडय़ुडरे इटूरिझगाला हरवले. निहाल सरिनने अँटन गुइजरला बरोबरीत रोखले. परंतु आर. प्रज्ञानंदने सांतोस लॅटासाकडून पराभव पत्करला. याचप्रमाणे भारत-अ आणि भारत-क संघांनी अनुक्रमे रोमानिया आणि चिली संघांवर २.५-१.५ अशा फरकाने विजय मिळवले.

महिला गटात भारत-अ संघाच्या सलग पाचव्या विजयात पुन्हा तानिया सचदेवने चमकदार विजयी कामगिरी केली. या संघाने फ्रान्सला २.५-१.५ असे हरवले. कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली आणि आर. वैशाली यांनी आपापल्या लढतीत बरोबरीत सोडवल्या. भारत-ब संघाने जॉर्जियाकडून ०-३ अशा फरकाने पराभव पत्करला, तर भारत-क संघाने ब्राझिलशी २-२ अशी बरोबरी साधली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या