कर चुकवेगिरी रोखण्यासाठी आयकर विभागाकडून रुग्णालयं, बँक्वेट हॉल आणि इतर व्यवसायांमधील रोख व्यवहारांवर आता लक्ष ठेवलं जाणार आहे. आयकर विभागाच्या नियमानुसार कर्ज किंवा ठेवींसाठी २० हजारांहून अधिक रक्कम रोख स्वरुपात स्वीकारण्यास मनाई आहे. अशाप्रकारचे व्यवहार केवळ बँकेकडूनच केले जावेत, असे आयकर विभागाचे निर्देश आहेत.
त्याचप्रमाणे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकडून दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम स्वीकारण्यावर देखील निर्बंध आहेत. लोक नोंदणीकृत ट्रस्ट किंवा राजकीय पक्षांकडेही अशाप्रकारे रोखीने व्यवहार करण्यास आयकर विभागाकडून मनाई करण्यात आली आहे. काही संस्था आणि रुग्णालयांमधील रोख व्यवहारांवर सध्या आयकर विभाग लक्ष ठेवून आहे. रुग्णालयात दाखल होताना रुग्णाचे पॅन कार्ड रुग्णालय प्रशासनाकडे जमा करणे अनिवार्य आहे. मात्र, या नियमाकडे अनेक रुग्णालये दुर्लक्ष करत असल्याचे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. ‘एनडीटीव्ही’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अशा रुग्णालयांवरील कारवाईसाठी सध्या आयकर विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. आरोग्य सेवेसाठी मोठी रक्कम रुग्णालयात जमा करण्याऱ्या रुग्णांच्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात येणार आहे. आयकर विभागाकडे दाखल वार्षिक माहिती विवरणपत्रातील रोख व्यवहारांचे निरिक्षण देखील विभागाकडून करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या