रेल्वे गाड्या आणि एसटीचे आरक्षण मिळत नसल्यामुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी अनेकांना आरायमदायी खासगी प्रवासी बसची निवड करावी लागत आहे. मात्र, या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडे मोजावे लागत आहे. मुंबई, ठाण्यातून रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत वातानुकूलित बसमधील शयनयान श्रेणीसाठी २,२०० ते २,५०० रुपये भाडे आकारण्यात येत आहे. अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने अनेकांना नाईलाजाने खिशाला खार लावून कोकणाची वाट धरावी लागणार आहे.
करोनामुळे २०२० मध्ये गणेशोत्सवासाठी अनेकांना कोकणात जाता आले नाही. तर २०२१ मध्येही करोना आणि निर्बंधांमुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेल्यांची संख्या कमी होती. यावेळी रुग्णसंख्या कमी असून निर्बंधही हटविण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे, एसटी, तसेच वैयक्तिक वाहनाने कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गणेशोत्सवानिमित्त २७ ऑगस्टपासून कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना गर्दी असून तीन हजार एसटी गाड्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता रेल्वे, एसटीचे आरक्षण मिळत नसल्याने अनेकांनी कोकणात जाण्यासाठी खासगी प्रवासी बसचा पर्याय निवडला आहे.
बसचा प्रवास गणेशोत्सवकाळात महाग झाला –
मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये २७ ऑगस्टपासून जाणाऱ्या वातानुकूलित शयनयान बससाठी प्रति प्रवासी २,२०० ते २,५०० रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहेत. सध्या हे दर १,५०० रुपये इतके आहे. तर याच मार्गावर विनावातानुकूलित आसन व्यवस्था असलेल्या बससाठी सध्या प्रति प्रवासी ५०० रुपये तिकीट आकारण्यात येत आहेत. मात्र गणेशोत्सवकाळात तिकीटाचे दर ७०० ते ८०० रुपये करण्यात आले आहे. चिपळूण, कणकवली, सावंतवाडी, नागपूर, कोल्हापूर यासह अन्य ठिकाणी जाणाऱ्या बसचा प्रवास गणेशोत्सवकाळात महाग झाला आहे. गर्दीच्या काळात शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या खासगी प्रवासी बस वाहतुकदारांविरूद्ध परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात येते. मात्र यासंदर्भात अद्याप परिवहन विभागाने निर्णय घेतलेला नाही.
0 टिप्पण्या