“गोविंदाना आरक्षण देण्यापेक्षा डोंबारी खेळ करणाऱ्या…” तृप्ती देसाईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर दहीहंडी पथकातील गोविंदांना शासकीय नोकऱ्यांमध्ये खेळाडू कोट्यातून पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर अनेक राजकीय नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

त्यांनी फेसबूकवर एक पोस्ट करत डोंबारी खेळ करणाऱ्या गोरगरीबांच्या मुलांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. “वर्षातून एक दिवस दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्यापेक्षा दररोज साहसी डोंबारी खेळ करणाऱ्या गोरगरीब मुलांना आरक्षण द्या, किमान आशीर्वाद तरी मिळतील” असं तृप्ती देसाई यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मागील दोन वर्षात महाराष्ट्रात करोना विषाणूच्या संसर्गानं थैमान घातलं होतं. त्यामुळे दरम्यानच्या काळात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. सध्या करोना विषाणूचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला आहे, त्यामुळे यंदा राज्यभरात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. सरकारनेही यंदा गोविंदांना भरघोस सूट आणि योजनांचा लाभ दिलेला आहे. मात्र यावरुन शिंदे सरकारवर आता टीका केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या