धनकवडीतील जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा: गुंडासह ३५ जणांच्या विरोधात गुन्हा
पुणे : धनकवडीतील दोन जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत जुगार अड्डा मालक गुंडासह, कामगारांसह जुगार खेळणारे अशा ३५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धनकवडीतील फाईव्ह स्टार सोसायटीच्या परिसरात सराईत गुंड सुनील निर्मळ दोन वेगवेगळे जुगार अड्डे चालवित असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत नऊ हजार ७० रुपयांची रोकड, १६ मोबाइल संच, जुगाराचे साहित्य असा एक लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार अड्ड्याचा मालक निर्मळ याचा पोलिसांकडून शाेध घेण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, राणे, चव्हाण, इरफान पठाण, माने, साबळे आदींनी ही कारवाई केली.
0 टिप्पण्या