आदित्य ठाकरेंच्या सभांना गर्दी का? भाजप खासदार सुजय विखेंनी सांगितलं गणित


अहमदनगर :
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे  सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ठिकठिकाणी त्यांच्या सभांना मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. त्यापेक्षा मोठी गर्दी जमवून दाखविण्याचे आव्हानही दिले गेले. तर इकडे भाजपचे युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील   यांनी या गर्दीमागील गणित सांगत ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटात उरलेल्यांवर निशाणाही साधला आहे. गर्दी आणि सध्याची राजकीय गणिते सांगून राजकारणातील वास्तवाची स्वानुभावरून जाणीव करून देण्याचा प्रयत्नही विखे पाटील यांनी केला आहे.

सभेची गर्दी ही कॅमेऱ्याची कमाल

डॉ. विखे पाटील अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. इकडे राज्यात ठाकरे यांच्या सभांना गर्दीची चर्चा सुरू झाल्यावर त्यांनी यासंबंधी प्रसार माध्यमांकडे आपले मत व्यक्त केले आहे, ते म्हणाले, सभेची गर्दी ही कॅमेऱ्याची कमालही असून शकते. ज्या पद्धतीने दाखवायचे तसे चित्रिकरण केले असावे. अनेक राजकीय नेत्यांच्या सभांना गर्दी होते. लोकांना काय नवेपण आहे ते पाहण्याचे कुतूहल असते. ठाकरे यांना प्रतिसाद मिळत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही कितीही गर्दी केली आणि मते पडत नसतील तर त्याला अर्थ नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यासंबंधी लोकसभा निवडणुकाच्या वेळचा स्वत:चा अनुभवही त्यांनी सांगितला.

आजोबा-वडिलांच्या कार्याचं योगदान ५० टक्के

डॉ. विखे पाटील म्हणाले, आपले आडनाव अथवा कुटुंबाच्या आधारावर मते पडण्याचा काळ आता गेला. त्यावेळी मी खासदार झालो यात माझे आजोबा, वडील यांच्या कार्याचे योगदान ५० टक्के आहे. मात्र ५० टक्के पक्ष व स्वकर्तृत्त्वावर आपले स्थान निर्माण करावे लागते. त्यामुळे तुम्ही कोणत्या कुटुंबातील आहात. कोठून आला आहात. तुमचे वडील कोण होते, आजोबा कोण होते. या गोष्टी आजच्या राजकारणात ५० टक्केच प्रभाव करतात, असे त्यांनी स्पष्ट केले, असेही विखे पाटील म्हणाले.

आमचाही शिवसेना-काँग्रेस-भाजपात प्रवास

पक्षांतरासंबंधी ते म्हणाले, आम्हीही शिवसेनेत होतो. नंतर काँग्रेसमध्ये गेलो. पुढे भाजपमध्ये आलो. या तीन पक्षांच्या चिन्हावर आमच्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका लढविल्या. त्यामध्ये आमचे सदस्य प्रत्येकवेळी निवडून आले. आता शिवसेनेचे ते ४० आमदार काही दूधखुळे नाहीत. ते तिसऱ्यांदा अथवा चौथ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकलेले आहेत. कोणी येण्याने अथवा जाण्याने फरक पडत नाही. आपण मतदार संघाला एक कुटुंब म्हणून संभाळतो. मलाही लोकसभेत पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पाया भक्कम आहे, असेही त्यांनी सांगितले.

मागील निवडणुकीत शिवसेनेची भाजपसोबत युती होती. त्यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आणि फोटो वापरून विजयी झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत उरलेल्या आमदार आणि खासदारांनी आपला राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून यावे, असे आव्हानही डॉ. विखे पाटील यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या