“एका मंत्रीमहोदयांनी सर्वांसमोर आम्हाला विचारलं की तुम्हाला ५० खोके…”: आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप!


राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधली सुंदोपसुंदी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अधिकच वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली असताना त्यावर अद्याप सरकारकडून निर्णय झाला नसल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून विरोधकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तसेच, एका मंत्र्यांनी सर्वांसमोर ५० खोक्यांची ऑफर दिल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

“चलो गुवाहाटी, फिफ्टी-फिफ्टी!”

आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करताना विरोधकांनी थेट फिफ्टी-फिफ्टी बिस्किटांचे पुडेच दाखवत सरकारवर खोचक टीका केली. “चलो गुवाहाटी, चलो गुवाहाटी, फिफ्टी-फिफ्टी, फिफ्टी फिफ्टी”, “५० खोके, ५० खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके”, “ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा”, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. शिंदे गटातील काही मंत्री विधानभवनात जात असताना पायऱ्यांवर उभ्या असलेल्या विरोधकांनी “आले रे आले, गद्दार आले”, असं म्हणत त्यांना खिजवण्याचा देखील प्रयत्न केला.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी गंभीर दावा केला आहे. “एका मंत्रीमहोदयांनी पायऱ्यांवर आपल्या सर्वांसमोर आम्हाला विचारलं की ५० खोके तुम्हाला हवेत का? म्हणजे नक्की ५० खोक्यांमध्ये होतं काय? आम्ही आज फिफ्टी-फिफ्टीची बिस्किटं हातात घेतली होती. पण त्यांच्या हातात अजून काही ५०-५० चं होतं का? ते गुवाहाटीला का गेले? हा मोठा प्रश्न आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

“अशा मस्तीमध्ये कुणीही मंत्री…”

“या तात्पुरत्या गद्दार सरकारचे मंत्रीमहोदय जे बोलले, त्यांचं वक्तव्य या देशानं बारकाईने ऐकलं पाहिजे. अशा मस्तीमध्ये कुणीही मंत्री पायऱ्यांवर दुसऱ्यांना खुलेआमपणे ऑफर देऊ शकतो का? याचा विचार जनतेनं करायला हवा”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी टीका केली.

“गद्दार नाही तर अजून काय म्हणायचं?”

दरम्यान, शिंदे गटाकडून ‘आम्ही गद्दार नाही, खुद्दार आहोत’, अशा केलेल्या बचावावर आदित्य ठाकरेंनी तोंडसुख घेतलं. “आमचं एक नातं तोडून ते गेले. मग याला अजून काय म्हणणार? गद्दार आहेत. त्यांना गद्दारच म्हणणार. महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून ते निघून गेले. त्यांना गद्दार म्हणायचं नाही तर काय म्हणायचं?” असा सवाल त्यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या