‘राष्ट्रवादीचा मोठा नेता जेलमध्ये जाणार’ म्हणणाऱ्या मोहित कंबोज यांना मिटकरींचा टोला, म्हणाले “कोणाच्या चड्डीचा नाडा…”


भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली असून, राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोहित कंबोज यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही मोहित कंबोज यांच्यावर टीका केली असून ते कोणाच्या चड्डीचा नाडा आहेत हे सर्वांना माहिती आहे असा टोला लगावला आहे. ते मुंबईत विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अमोल मिटकरींची टीका –

मोहित कंबोज यांनीच भोंगे वाटले होते. ते भाजपाचे भोंगे आहेत. शेतकरी, जीसएटीच्या प्रश्नावर बोलताना ते दिसत नाहीत अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. हा कोण आहे मोहित कंबोज असा एकेरी उल्लेखही यावेळी त्यांनी केला.

ईडीच्या दारात बसून त्यांनी ही माहिती मिळवली आहे का? मोहित कंबोजचीही चौकशी झाली पाहिजे. ईडी कोणाच्या घरी धाड टाकेल त्यासंबंधी ट्वीट करत असेल, पत्रकार परिषद घेणार असतील तर हे संशयास्पद आहे. मोहित कंबोज हा कोणाचा कार्यकर्ता, माणूस, कोणाच्या चड्डीचा नाडा आहे सर्वांना माहिती आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

मोहित कंबोज यांचा दावा काय आहे?

मोहित कंबोज यांनी मंगळवारी काही ट्वीट केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे, असं दावा त्यांनी केला आहे. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आणखी एक ट्वीट करत कंबोज यांनी सिंचन घोटळ्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “२०१९ मध्ये परमबीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा.” या ट्वीटमध्ये कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.

आपण लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार आहे. संबंधित नेत्याची देश आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, प्रेयसींच्या नावावरील संपत्ती, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी याबाबत खुलासा करणार आहे, असंही कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या