औरंगाबादेतील बॅडमिंटनपटूचे नाव आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी महिलांच्या यादीत: खंडपीठाची स्वातंत्र्यदिनी सुनावणी


औरंगाबाद:
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र ठरलेला शहरातील राष्ट्रीय बॅंडमिंटन पटू प्रथमेश प्रकाश कुलकर्णी याला बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाच्या कारभाराचा फटका बसला असून, ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या यादीत त्याचे नाव समाविष्ट नाही होऊ शकले. प्रथम महिला गटात नाव समाविष्ट केले आणि नंतर चुकीची दुरूस्ती करण्यात आली नाही. या प्रकरणात प्रथमेशचे पालक तथा माजी सैनिक प्रकाश कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली असून, न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अरूण पेडणेकर यांनी शहरातील या होतकरू आणि गुणी खेळाडूसाठी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता सुनावणी ठेवली. केंद्राचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांना सर्व माहितीसह हजर राहण्याचे आदेश दिले. 

मागील काही तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत असलेला शहरातील खेळाडू प्रमेश कुलकर्णी याला कार्यालयातील बाबुंच्या लहरीपणाचा फटका बसला. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय मानांकनात ५५ वरून २३ व्या क्रमांकावर मजल मारणाऱ्या मेहनती खेळाडूला आता बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाच्या चुकीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेपासून वंचित राहावे लागत आहे. इंडिया ज्युनीअर इंटरनॅशनल ग्रॅंड ट्रीक्स या पुणे येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली होती. संबंधित निवड गोवा येथे २५ जुलैला पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून झाली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत समाविष्ट होण्यासाठी बॅडमिंटर फेडरेशन ऑफ इंडियाकडे रितसर अर्ज सादर केला. आंतरराष्ट्रीय स्पर्देसाठी नाव नाेंदविताना चुकून त्याचा समावेश महिलांच्या यादीत केला. यासंबंधी अर्ज फाटे विनंत्या केल्यानंतर त्याचे नाव महिला यादीतून हटविले परंतु पुरूषांच्या यादीत समाविष्ट केले नाही. याविरोधात औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. अॅड. अमोल जोशी यांनी राष्ट्रीय मानांकन २३ असताना खेळाडूला फेडरेशनच्या चुकीचा फटका सहन करावा लागत आहे, असा मुद्दा मांडून अत्यंत मेहनतीतून खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे, असे याचिकेत म्हटले आहे. बॅडमिंटन ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या अखत्यारित असल्याने यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांना मत मांडायचे निर्देश दिले. ज्या स्थितीत गणेवशात असले तरी खंडपीठात वादी प्रतिवादींनी हजर राहावे असे आदेश दिले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या