केतकी चितळेची कलाकुसर, अटकेदरम्यान शाईफेकमुळे खराब झालेल्या ‘त्या’ ब्लाऊजवर काढलं त्रिशूळ


मराठी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने तिच्या फेसबुक अकाऊंटद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. या प्रकरणी केतकीला अटक करण्यात आली. पण अटकेदरम्यान तिच्यावर शाईफेक करण्यात आली. यामध्ये तिच्या ब्लाऊजवर शाईचे काही डाग राहिले. आता याच ब्लाऊजवर तिने एक डिझाइन तयार केली आहे.

केतकीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ब्लाऊज रंगवताना दिसत आहे. जेव्हा शाईफेक करण्यात आली तेव्हाचे फोटो व्हिडीओच्या सुरुवातीला दिसत आहेत. त्यानंतर शाईमुळे खराब झालेला ब्लाऊज ती दाखवत आहे. केतकीने ब्लाऊजवर जिथे शाई दिसत आहे तिथे रंग भरले आहेत. इतकंच नव्हे तर या ब्लाऊजवर तिने त्रिशूळ काढलं आहे.

व्हिडीशो शेअर करत “हर हर महादेव” असं तिने म्हटलं आहे. केतकीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी केतकीच्या कलेचं कौतुक केलं आहे. अति सुंदर, तू अगदी हुशार आणि हिमतीने प्रसंगांना सामोरं जाणारी मुलगी आहेस, तुला अधिक बळ मिळो अशा अनेक सकारात्मक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

केतकी जवळपास महिनाभर कारागृहात होती. केतकी कारागृहातून जेव्हा बाहेर आली तेव्हा तिने ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली होती. केतकीने या सगळ्या प्रसंगांचा हिंमतीने सामना केल्यामुळे सोशल मीडियावर तिचं कौतुक होताना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या