पुण्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तर…? अमृता फडणवीस म्हणाल्या…“त्यांची जन्मभूमी, कर्मभूमी…”


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री म्हणून देखील बघायला आवडेल, असे विधान देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीसांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि बालेकिल्ला नागपूर आहे. ते नागपूरचे पालकमंत्री जरी असले, तरी आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करतात, असे पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या.

मला महाराष्ट्र खूप आवडतो. मला याच राज्यात राहायचं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनाही महाराष्ट्रातच बघायला आवडेल, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीत स्थान मिळाले आहे. फडवीसांनी याआधी अनेक राज्यांमध्ये प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. मात्र, केंद्रीय पातळीवरील एका महत्त्वाच्या समितीमध्ये त्यांचा यावेळी पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीस आता केंद्रीय राजकारणाकडे वळतील का? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

शिंदे सरकारचा पाया काय आहे? हे सर्वांनाच माहित आहे, असं म्हणत विरोधकांच्या ‘गद्दार’ या टिप्पणीवर अमृता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.  टीका करणाऱ्यांची विश्वासाहर्ता काय आहे? अशा व्यक्तींवर बोलणं म्हणजे प्रतिष्ठा सोडून बोलल्यासारखं होईल, असे फडणवीस  यावेळी म्हणाल्या. दरम्यान, गोविंदांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या शिंदे सरकारच्या निर्णयाला अमृता फडणवीस यांनी पाठिंबा दर्शवला आहे. दहिहंडी आपली परंपरा आहे. या उत्सवाला वाव मिळायला हवा, असेही फडणवीस यावेळी म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या