“मशिदीमध्ये श्रीकृष्णाची पूजा करण्यास परवानगी द्या, अन्यथा…” रक्ताने लिहिलेल्या पत्रात हिंदू महासभेच्या सदस्याची योगींकडे ‘ही’ मागणी


जन्माष्टमीला शाही मशीद ईदगाहमध्ये भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्यास परवानगी द्या, अशी मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या एका सदस्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केली आहे. महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश शर्मा यांनी स्व:तच्या रक्ताने लिहिलेल्या या पत्रात शाही मशीद हेच श्रीकृष्णाचे जन्मस्थान असल्याचा दावा केला आहे. “जन्मस्थान नसलेल्या ठिकाणी आजवर कृष्णाची पूजा करण्यात आली. कृष्ण जन्मभूमीत पूजेची परवानगी नाकारल्यास जगणं व्यर्थ आहे. मला मरण्याची परवानगी द्या” अशी मागणी शर्मा यांनी या पत्रात केली आहे.

योगी आदित्यनाथ हे हनुमानाचा अवतार असल्याचे दिनेश शर्मा यांनी म्हटले आहे. मशिदीमध्ये श्रीकृष्णाची पूजा करण्यास योगी परवानगी देतील, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला आहे. कृष्ण जन्मभूमी वादाशी संबंधित अनेक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. कृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह वाद देखील न्यायालयाच्या अखत्यारित आहे. कात्रा केशव देव मंदिरांच्या जागेवर शाही ईदगाह मशीद बनवण्यात आली असून ती हटवण्यात यावी, अशी मागणी हिंदू याचिकाकर्त्यांनी न्यायालयात केली आहे. मुस्लीम पक्षाने या याचिकेचा विरोध केला आहे. या प्रकरणाशी संबंधित याचिका याआधीही ३ ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली.

शर्मा यांनी वरिष्ठ विभागाच्या दिवाणी न्यायालयातील न्यायाधीश ज्योती सिंग यांच्याकडे १८ ‘मे’ला विनंती याचिका दाखल केली होती. शाही ईदगाह मशिदीमध्ये बाळकृष्णाला अभिषेक करण्याची परवानगी शर्मा यांनी न्यायालयाकडे मागितली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बाबरी मशीद वाद मिटल्यानंतर काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशिदीचा वाद पुढे आला होता. या ठिकाणी प्राचिन काळात मंदिरं असल्याचा दावा हिंदू याचिकार्त्यांनी केला आहे. या दोन्ही मशिदींचे वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या