अतिवृष्टीनंतर मराठवाडय़ातील शेतकरी हवालदिल: यंत्रणा ठप्प


औरंगाबाद :
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील बंडू इंगोले यांची मुळातच दोन एकर शेती. या दोन एकरांतील सोयाबीन पूर्णत: गेले. अतिवृष्टीमध्ये जलेश्वर नदीला पूर आला. त्यात एक म्हैस-वासरू वाहून गेले. आता त्यांच्यासमोरचे प्रश्न अधिक किचकट बनले आहे. कळमनुरी तालुक्यातील कान्हेगाव येथील शेतकरी पुंडलिक वाघमारे यांचे जगणेही आता मुश्कील बनले आहे.

मराठवाडय़ातील तीन जिल्ह्यांतील सात लाख ४ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण होऊन मदतीची मागणी करण्यात आल्यानंतर निकषापेक्षा दुप्पट मदत देण्याचा राज्य सरकारने निर्णय जाहीर केला असला, तरी ती मदत मिळणार कधी, हा प्रश्न अनुत्तरित आहे. मराठवाडय़ातील तीन जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड, हिंगोली या दोन जिल्ह्यांतील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची शेती खरवडून गेली आहे. पिकेही हातची गेली असल्याने शेतकरी हवालदिल आहेत. शिवसेनेकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद आल्यानंतर अंबादास दानवे यांनी नुकताच या भागाचा दौरा केला. तत्पूर्वी अजित पवार यांनीही शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी सरकारकडे केली होती; पण नदीकाठच्या काही शेतकऱ्यांचे सारेच वाहून गेल्याने त्यांच्या अडचणी खूप अधिक आहे.

मराठवाडय़ातील हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील ३२९ हेक्टर जमीन वाहून गेलेली आहे. जवळपास चार लाख ४८ हजार ७५४ हेक्टर जमिनीवरची पिके बाधित झाली. नांदेड जिल्ह्यात रस्ते व पूल वाहून जाण्याच्याही घटना अधिक असल्याने त्यासाठी मोठा निधी लागणार आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण करतानाच्या निकषापेक्षा दुप्पट मदतीची घोषणा राज्य सरकारने केली आहे. पण ही मदत कधी मिळेल, कशी मिळेल याचे आदेश अद्याप प्रसृत झाले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवे सरकारही शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असा संदेश देत केलेल्या घोषणांची अंमलबजावणी कशी होते, यावर बरेच काही अवलंबून आहे. मदत देताना ‘ऑनलाइन’चे घोळ नेहमी घातले जातात. अद्याप आदेश आले नसल्याने शेतकरी मदतीची वाट पाहत आहे. अनेक शेतकऱ्यांचे जगणे आता मुश्कील झाले आहे. बंडू इंगोले म्हणाले, दोन एकरांवरील सारे सोयाबीन वाया गेले आहे. नदीकाठची जमीन असल्याने नुकसान दरवेळी होते; पण या वेळी रब्बीमध्येही काही हाती लागणार नाही. कारण जमीनच खरवडून गेली. अतिवृष्टीमधील नुकसानभरपाई देण्याचा कालावधी कमी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष व्यवस्था निर्माण करायला हवी, अशी मागणी आता केली जात आहे. सत्ताधारी भाजप व शिंदे गटाच्या वतीने पाहणीचे फारसे दौरे झाले नाहीत. मात्र घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खाते मिळाल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

मराठवाडय़ातील नुकसान

* मराठवाडय़ातील ४५० महसूल मंडळांपैकी २०७ महसूल मंडळांत अतिवृष्टी

* सर्वाधिक नुकसान नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत

* या पावसाळय़ात पुरात वाहून गेलेले व वीज पडून मृत्यू झालेल्या ५२ व्यक्ती * मृत जनावरांची संख्या ७४६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या