एकवीरा देवी गडावर जाण्यासाठी रज्जू मार्ग ; सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात


 पुणे : एकवीरा देवी गडावर जाण्यासाठी रज्जू मार्ग (रोप-वे) प्रस्तावित करण्यात आला आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग, वनविभाग यांच्या सहकार्याने पर्यटन विभागाकडून हा प्रकल्प करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट – डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. येत्या महिन्याभरात हा अहवाल तयार होणार असून त्याचे सादरीकरण मंत्रिमंडळासमोर केले जाणार आहे.

एकवीरा देवीचे मंदिर डोंगरावर आहे. सह्याद्री पर्वताच्या कुशीतील कार्ला येथील डोंगरावर हे मंदिर आहे. त्यामुळे पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात. देवीचे मंदिर डोंगरात असून परिसरात लेणी आहे. तिला कार्ला लेणी असे म्हटले जाते. मंदिराचा गाभारा खूप छोटा आहे. हा परिसर देवीच्या दर्शनासह पर्यटनासाठी आणि निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते.

पावसाळ्यामध्ये या परिसरातील सृष्टी सौंदर्य मनाला मोहवून टाकणारे असते. डोंगरावरून खळाळत कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी आणि या ठिकाणापासून जवळच प्रसिद्ध लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे असल्याने या ठिकाणी पर्यटक गर्दी करतात. भाजे लेणीसह लोहगडासह अन्य शिवकालीन ऐतिहासिक किल्ले आहेत. त्यामुळे देवदर्शनाबरोरच पर्यटनासाठीही अनेकजण या भागात येतात.

लोणावळ्याजवळील कार्ला येथील श्री एकवीरा देवी मंदिरात (फ्युनिक्युलर ट्रॉली) किंवा रोप वे तयार करण्यासाठी राज्य पर्यटन विभाग आणि इंडियन पोर्ट रेल आणि रोप वे कॉर्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. रज्जू मार्गाच्या निर्मितीसाठी आर्थिक आणि तांत्रिक सोयींसाठी अहवाल तयार करणे, निविदा प्रक्रिया राबवणे यासाठी राज्य पर्यटन विभाग आणि आयपीआरसीएल यांच्यात हा करार करण्यात आला आहे. हा प्रकल्प ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ (बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर मॉडेल) या तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे, असे पर्यटन विभागाकडून सांगण्यात आले.

लोकप्रिय तीर्थक्षेत्र असल्याने आणि जवळ कार्ला लेणी पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी रज्जू मार्ग प्रकल्पाची निर्मिती करण्यात येत आहे. एकवीरा देवी मंदिरात दरवर्षी सात ते आठ लाख भाविक येतात. रज्जू मार्गामुळे एकविरा मंदिरात भाविकांना सहज पोहोचता येणार आहे, परिणामी पर्यटनाला चालना मिळणार आहे. प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल पर्यटन विभाग करत असून तो अंतिम टप्प्यात आहे. येत्या महिन्याभरात अहवालाचे सादरीकरण मंत्रिमंडळासमोर केले जाणार आहे. स्थानिकांना दुकाने, पादचारी पूल (स्कायवॉक) प्रस्तावित करण्यात आल्याचेही पर्यटन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

या प्रकल्पाला स्थगिती नाही

महाविकास आघाडी सरकार असताना हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार आल्यानंतर बहुतांश निर्णयांना स्थगिती देण्यात आली. मात्र, एकवीरा देवी गडावर करण्यात येणाऱ्या रज्जूमार्ग प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली नाही. प्रकल्पासाठी कमी जागेचे अधिग्रहण करावे लागणार असून प्रकल्पामुळे कुणीही बाधित होणार नसल्याचेही पर्यटन विभागाकडून सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या