CBI कारवाईनंतर केजरीवाल संतापले, न्यूयॉर्क टाइम्सचा फोटो केला ट्वीट, म्हणाले “जग कौतुक करत असताना…”


दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत असल्यानेच कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याआधी टाकलेल्या छाप्यातून काही निष्पन्न झालं नव्हतं, आणि यावेळीही होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सीबीआयने दिल्ली उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ शी संबंधित १० ठिकाणांवर आज छापे टाकले असून, यामध्ये मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानाचाही समावेश आहे.

“दिल्लीच्या शिक्षण धोरणाचं कौतुक होत असताना आणि अमेरिकेतील सर्वात मोठं वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्समध्ये मनीष सिसोदिया यांचा फोटो आला आहे, तेव्हाच केंद्राने मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयला पाठवलं आहे,” असं केजरीवाल म्हणाले आहेत.

“सीबीआयचं स्वागत आहे. आम्ही पूर्ण सहकार्य करु. याआधीही छापे पडले असून, चौकशी झाली आहे. पण यातून काही बाहेर आलं नव्हतं, यावेळीही काही मिळणार नाही,” असा विश्वास अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या महिन्यात दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी सीबीआय तपासाची शिफारस केली होती. याप्रकरणी त्यांनी उत्पादन शुल्काच्या ११ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही केली होती. महत्त्वाचं म्हणजे, मनीष सिसोदिया यांनीदेखील सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

मनिष सिसोदिया यांचं ट्विट –

“सीबीआय आलेली असून त्यांचे स्वागत आहे. आम्ही ईमानदार आहोत. लाखो मुलांच्या भविष्य उभारणीचे काम आम्ही करत आहोत. जो चांगले काम करतो त्याला असाच त्रास दिला जातो. आपल्या देशाचे हे दुर्देव आहे. याच कारणामुळे आपल देश प्रथम क्रमांकावर नाही,” असं ट्वीट करत मनीष सिसोदिया यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.

तसंच, “सत्य लवकर समोर यावे म्हणून आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करू. माझ्यावर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. या कारवाईतूनही काहीही समोर येणार नाही. चांगले शिक्षण देण्याच्या आमच्या प्रयत्नांना कोणीही रोखू शकत नाही,” असंदेखील सिसोदिया म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या