एबीजी शिपयार्डचा 22 हजार कोटींचा घोटाळा, माजी अध्यक्षांना अटक.

 




देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने ABG शिपयार्डचे माजी अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवालांना 22,842 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी अटक केली आहे. हा देशातील बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा मानला जातो.

एबीजी शिपयार्ड लिमिटेड ही एबीजी ग्रुपची प्रमुख कंपनी आहे. ही कंपनी गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे जहाजांची निर्मिती (Ship Manufacturing) आणि दुरुस्तीचे काम करते. ABG शिपयार्ड लिमिटेडची स्थापना 1985 मध्ये करण्यात आली असून, आतापर्यंत या कंपनीने 165 हून अधिक जहाजांची निर्मिती केली आहे. मात्र, एकेकाळची भारतातील सर्वात मोठी खाजगी शिपयार्ड कंपनी आता कर्जबाजारी झाली आहे.

स्टेट बँकेने केलेल्या (SBI) तक्रारीनुसार, कंपनीने बँकेकडून 2,925 कोटी रुपये, आयसीआयसीआय (ICICI) बँकेकडून 7,089 कोटी रुपये, आयडीबीआय बँकेकडून 3,634 कोटी रुपये, बँक ऑफ बडोदाकडून 1,614 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेकडून 1,244 कोटी रुपये, तर इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 1,228 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. मात्र, त्याचा वापर ज्या कारणासाठी दाखविण्यात आला होता तेथे खर्च न करता इतर ठिकाणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. या कंपनीला 28 बँका आणि वित्तीय संस्थांकडून क्रेडिट सुविधा मंजूर करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये SBI चे एक्सपोजर 2468.51 कोटी इतके होते.

18 जानेवारी 2019 रोजी अर्नेस्ट अँड यंगने सादर केलेल्या फॉरेन्सिक ऑडिट अहवालातून (एप्रिल 2012 ते जुलै 2017) आरोपींनी एकमेकांशी संगनमत करून बेकायदेशीर प्रकार केल्याचे समोर आले आहे. यामध्ये भांडवल वळवणे, अनियमितता, गुन्हेगारी विश्‍वासाचा भंग आणि बँकांकडून घेतलेले पैसे मुळ कारणासाठी न वापरता इतर कारणांसाठी वापरणे यांचा समावेश आहे. ऑडिटमध्ये हे उघड झाले आहे की, 2012 आणि 2017 दरम्यान आरोपींनी निधीचा गैरवापर आणि अवैध गोष्टी घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या