Breaking News

रूग्णासाठी वाहतूक कोंडीत अडकलेला डॉक्टर 45 मिनिटं धावला अन्...


  बंगळुरू येथील वाहतूक कोंडींचा प्रत्यय आपल्यापैकी अनेकांना आला असेल. यामुळे अनेकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र, बंगळुरूमध्ये वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका डॉक्टरने चक्क रूग्णावरील सर्जरीसाठी तीन किमी अंतर पार करण्यासाठी 45 मिनिटं धावल्याचे समोर आले आहे. 45 मिनिटं धावल्यानंतर या डॉक्टरने संबंधित रूग्णावर यशस्वी सर्जरी केली. या घटनेनंतर प्रत्येक नागरिकाकडून या डॉक्टरचे कौतुक केले जात आहे. ही घटना 30 ऑगस्ट रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे.


 याबाबत अधिक माहिती अशी की, बंगुरुतील डॉ. गोविंद नंदकुमार हे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे सर्जन आहेत. 30 ऑगस्ट रोजी ते कनिंगहॅम रोडवरून सर्जापूरच्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये निघाले होते. मात्र, मुसळधार पाऊस आणि ठिकठिकाणी पाणी साठल्याने त्यांना अखेरच्या टप्प्यात म्हणजेच हॉस्पिटल केवळ तीन किमी अंतरावर त्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.


 वाहतूक कोंडी सुरळीत होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने नंदकुमार यांनी कारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. डॉ. गोविंद म्हणाले की, जॅममध्ये अडकल्यानंतर त्यांनी गुगल मॅपवर तपासले की, त्यांना रुग्णालयात पोहोचण्यास 45 मिनिटे लागतील. यानंतर त्यांनी रुग्णालयाचे अंतर तपासले, जे सुमारे तीन किलोमीटरचे अंतर दाखवत होते.


 
शस्त्रक्रिया होईपर्यंत रूग्णाला काहीही खाण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे जर मी, वाहतूक कोंडी सुटेपर्यंत वाट बघत बसलो असतो तर, रूग्णाला बराच कळा उपाशी बसावे लागले असते. त्यामुळे कारमधून उतरून मी धावत जाण्याचा निर्णय घेतल्याचे नंदकुमार यांनी सांगितले. नंदकुमार गेल्या 18 वर्षांपासून सर्जरी करत असून, त्यांनी आतापर्यंत 1,000 हून अधिक यशस्वी सर्जरीज केल्या आहेत. त्यांचा पचनक्रियेशी संबंधित सर्जरी करण्यात हातखंडा आहे.

Post a Comment

0 Comments