पाच वर्षीय चिमुकल्याने डॉक्टरांची वाट पाहत आईच्या हातावरच जीव सोडला


सरकारने लाखो दावे करूनही आरोग्य विभागाची यंत्रणा रुळावर येत नसल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील निकृष्ट आरोग्य सेवेमुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे. याचंच एक उदाहरण मध्य प्रदेशमधील जबलपूर जिल्ह्यातील बरगी आरोग्य केंद्रातील घटनेवरून दिसून आलं. या घटनेमुळे हळहळ आणि प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. वेळेवर डॉक्टर उपलब्ध न झाल्याने आणि उपचार न मिळाल्याने एका पाच वर्षीय मुलाने अखेर त्याच्या आईच्या हातावर जीव सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

जबलपूर जिल्ह्यातील चरगवां ठाणे हद्दीतील तीनहेटी देवरी येथील रहिवासी असलेल्या मुलाचे वडील संजय पंद्रे यांनी व त्यांच्या पत्नीने आजारी मुलाला उपचारासाठी बरगी येथील आरोग्य केंद्रात आणले होते. मात्र त्या ठिकाणी कोणताही डॉक्टर किंवा जबाबदार अधिकारी उपलब्ध नव्हता.

वेळेवर उपचार मिळाला असता तर मुलाचा जीव वाचला असता –

हे पाहून हतबल झालेले त्या मुलाचे आई-वडील बराच वेळ आरोग्य केंद्राच्या दारासमोरच वाट पाहत बसले. मात्र अनेक तास उलटल्यानंतरही डॉक्टर न आल्याने अखेर त्या आजारी असलेल्या चिमुल्याने आईच्या हातावरच जीव सोडला. संतापजनक बाब म्हणजे बालकाचा मृत्यू झाल्यानंतर देखील कितेक तास डॉक्टर किंवा अन्य कोणी अधिकारी तिथे पोहचलेच नाही. यामुळे संतप्त झालेल्या त्या आई-वडिलांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूस डॉक्टर आणि संबधित आरोग्य केंद्राचे अधिकारीच कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप केला. त्या मुलाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, जर वेळेवर उपचार मिळाला असता तर आमच्या मुलाचा जीव वाचला असता.

…म्हणून मला आरोग्य केंद्रात येण्यास उशीर झाला –

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुधारत असल्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच असल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळेतर आरोग्य यंत्रणेच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे प्रचंड उशीरा आरोग्य केंद्रावर पोहचलेल्या डॉक्टरने उशीरा येण्याचे काहीतरी भलतेच कारण पुढे केले. आदल्या दिवशी पत्नीचे व्रत होते म्हणून मला आरोग्य केंद्रात येण्यास उशीर झाला, असे संबंधित डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या