पुणे : विसर्जन मिरवणूक अद्यापही लांबलेलीच


पुणे :
सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचा गणपती टिळक चौकात पोहोचला असून, श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती आणि अखिल मंडई मंडळाचे गणपती विसर्जन मिरवणुकीत सामील झाले आहेत. काल सकाळपासूनच मिरवणूक संथ गतीने सुरू राहिल्याने ती पाहण्यासाठी आलेल्या गावोगावच्या भाविकांचा हिरमोड झाला.

पोलिसांनी सकाळपासून मिरवणूक लवकर संपवण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्यामुळे मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात काही ठिकाणी वादाचे प्रसंग उदभवू लागले आहेत.

रात्री बारा वाजता बंद झालेल्या ध्वनिक्षेपकांच्या भिंती सकाळचे सहा वाजताच पुन्हा सुरू झाले. मिरवणूक परिसरात अद्यापही ढणढणाट सुरू असून कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. पोलीस मंडळांना ध्वनिक्षेपकाचा आवाज कमी करण्यास सांगत असून लवकर पुढे जाण्यास सांगत आहेत.

विसर्जन मिरवणुकीत नाचताना एका व्यक्तीला अचानक चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी रुग्णवाहिकेला पाचारण केले. ध्वनिक्षेपकावरून ध्वनिक्षेपकाचा आवाज कमी करण्याचे आवाहनही करण्यात आले. रुग्णवाहिकेला चौकात येण्यासाठी जागा करून देण्यात आली आणि संबंधित व्यक्तीला लगेचच रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यात आले. सकाळपासून सुरू असलेला प्रचंड आवाज काही काळ शांत झाला. चौकातील सारे कार्यकर्तेही क्षणभर स्तब्ध झाले.

लक्ष्मी रस्त्याप्रमाणेच कुमठेकर मार्ग, शास्त्री रस्ता येथून जाणाऱ्या मिरवणुकाही सकाळपर्यंत सुरूच राहिल्याने, नोकरीवर जाणाऱ्या नागरिकांना वेळेत पोहोचणे अवघड झाले. मिरवणूक किती वाजेपर्यंत संपेल, याबद्दल सकाळी कोणीही अटकळ बांधू शकत नसल्याने, यंदा आजवरचे सर्व विक्रम मोडले जातील का, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या