ट्रेडिंग साठी अर्थतज्ञांकडून खास गुरु मंत्र .

 कमी अवधीत चांगला परतावा मिळण्यासाठी मोठ्या संख्येने गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळतात, मात्र कोणते शेअर घ्यावेत, याची त्यांना माहिती असतेच असे नाही. अलिकडच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने आलेख, तांत्रिक विश्लेषण याद्वारे शेअरमधील गुंतवणूक यशस्वी करण्यासाठीचे तंत्र विकसित झाले आहे. अशा या टेक्निकल व फंडामेंटलच्या साह्याने सर्वोत्तम शेअर शोधण्याचा यशस्वी मार्ग या लेखात विशद करण्यात आला आहे.

प्रसिद्ध गुंतवणूकगुरु, स्टॉक ब्रोकर आणि लेखक विल्यम ओ'नील यांच्या पद्धतीनुसार कंपन्यांच्या शेअरची हालचाल दर्शविणारे आलेख आणि कंपन्यांच्या मिळकतीचे विश्लेषण गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम शेअर शोधण्यास मदत करतात.

मध्यमवधीसाठी ट्रेडिंग करताना ‘टेक्नो-फंडा’ म्हणजेच आलेखानुसार; तसेच मूलभूत विश्लेषणानुसार सक्षमता दर्शवत असलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मर्यादित धोका स्वीकारून व्यवहार करणे फायदेशीर ठरू शकते. फंडामेंटलनुसार कंपनी भांडवलाच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण कमी ठेऊन व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर उत्तम परतावा मिळवत व्यवसायवृद्धी करत असेल, तसेच आलेखानुसार मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविणाऱ्या अवस्थेतून बाहेर पडत ब्रेकआऊट म्हणजेच तेजीचे संकेत देत असेल तर अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये मध्यम अवधीसाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने उत्तम संधी मिळत असते.

गुंतवणूक गुरु जॉर्ज सोरोस म्हणतात, तुम्ही बरोबर आहात की चूक हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही बरोबर असताना किती पैसे कमावता आणि चुकीचे असता तेव्हा किती गमावता, हे महत्त्वाचे आहे. टेक्नो-फंडामेंटलनुसार संधी ओळखून विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये व्यवहार करताना व्यवहार चुकल्यास तोट्याचे प्रमाण मर्यादित ठेवण्यासाठी एकाच कंपनीच्या शेअरमध्ये पूर्ण भांडवल गुंतविण्याऐवजी भांडवलाचे विभाजन करून विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये मर्यादित प्रमाणात भांडवल गुंतविणे योग्य ठरते. ट्रेडिंग करताना आलेखानुसार आधार पातळी म्हणजेच ज्या पातळीपासून शेअरने खाली जाणारी वाटचाल थांबवली आहे, अशा पातळीखाली ‘स्टॉपलॉस’ तंत्राचा वापर करून तोटा मर्यादित ठेवणे शक्य होऊ शकते.

आधारपातळीखाली स्टॉपलॉस तंत्राचा वापर करणे म्हणजे एखादा शेअर घसरण दर्शवत आलेखानुसार आधार पातळीच्या खाली गेल्यास आणखी घसरण होऊ शकण्याचे संकेत मिळतात. यामुळे आधार पातळीखाली गेल्यास मर्यादित तोटा स्वीकारून व्यवहारातून बाहेर पडणे. आलेखानुसार ब्रेक आऊट म्हणजेच तेजीचे संकेत मिळाल्यानंतर अल्पावधीच्या, मध्यम अवधीच्या आणि दीर्घावधीच्या आलेखाचे विश्लेषण करून गरजेनुसार स्टॉपलॉस तंत्राचा वापर करणे हिताचे ठरू शकते. संकेतांनुसार शेअरने आगामी काळात तेजीची वाटचाल चालू ठेवल्यास आलेखानुसार जोपर्यंत कलबदल झाल्याचे संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत तेजीचा कल दर्शविणाऱ्या शेअरमध्ये थांबून राहिल्यास उत्तम फायदा मिळू शकतो. अशा प्रकारे स्टॉपलॉस तंत्राचा वापर केल्याने चुकीच्या व्यवहारात तोटा मर्यादित ठेवता येऊ शकतो; तसेच बरोबर ठरलेल्या व्यवहारात जोपर्यंत कलबदल होत नाही, तोपर्यंत ‘ट्रेलिंग स्टॉपलॉस’ वापर करत थांबून राहिल्याने जास्त फायदा मिळविता येऊ शकतो.

गेल्या वर्षभरात निर्देशांकांनी नकारात्मक वाटचाल करत मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविला. मात्र टाटा इलेक्सी, वरुण बेव्हरेजेस, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स आदी कंपन्यांच्या शेअरनी टेक्नो-फंडामेंटलनुसार तेजीचे संकेत दिल्यांनतर उत्तम परतावा दिला. आता टेक्नो-फंडामेंटल पद्धतीनुसार कोणत्या कंपन्यांचे शेअर तेजीचा कल दर्शवत आहेत, याचा विचार करूया.

सर्वप्रथम निर्देशांकाचा २१ ऑगस्ट २०२२ पर्यंत टेक्नो-फंडामेंटलनुसार विचार केल्यास, दीर्घावधीच्या आलेखानुसार ऑक्टोबर २०२१ मध्ये ‘सेन्सेक्स’ने ६२,२४५ अंशांचा उच्चांक नोंदविल्यानंतर ६२,२४५ ते ५०,९२१ या पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शवत आहे, तर ‘निफ्टी’देखील १८,६०४ ते १५,१८३ या पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शवत आहे. ऑक्टोबर २०२१ पासून उतरणाऱ्या जिन्यासारखी वाटचाल करत घसरण दर्शविल्यानंतर जून २०२२ पासून उसळी घेत ऑगस्ट २०२२ मध्ये ‘सेन्सेक्स’ तसेच ‘निफ्टी’ पुन्हा उच्चांकाजवळ पोचले. आगामी काळात निर्देशांकाने उतरणाऱ्या जिन्यासदृश आकृतीस छेद देऊन ब्रेकआऊट केल्यास, तसेच पूर्वीचा उच्चांक ओलांडून अडथळा पातळीवर साप्ताहिक तत्वावर बंद भाव दिल्यास आलेखानुसार नवी ‘बुल रन’ म्हणजेच जोरदार तेजी सुरू झाल्याचे संकेत मिळू शकतात.

फंडामेंटलचा विचार करता सध्या ‘निफ्टी’चे किंमत उत्पादन गुणोत्तर २० ते २१ च्या आसपास आहे. यामुळे तेजीचे संकेत मिळाल्यास मर्यादित धोका स्वीकारून व्यवहार करणे योग्य ठरू शकेल. दीर्घावधीच्या आलेखानुसार निर्देशांक मर्यादित पातळ्यांमध्येच वाटचाल करताना दिसत आहे, मात्र काही कंपन्यांचे शेअर ब्रेकआउट देऊन वधारताना दिसत आहेत. आगामी काळात अशा कंपन्यांच्या शेअरनी तेजीची वाटचाल दर्शविल्यास मर्यादित भांडवलावर धोका स्वीकारून तेजीचा व्यवहार करणे योग्य ठरू शकेल. सध्या सुमितोमो केमिकल इंडिया, वेदांत फॅशन्स, होम फर्स्ट फायनान्स, आयशर मोटर्स आदी अनेक कंपन्यांचे शेअर टेक्नो-फंडामेंटलनुसार तेजीचा कल दर्शवत आहेत.

दीर्घावधीच्या आलेखानुसारदेखील आयशर मोटर्स या कंपनीच्या शेअरने सप्टेंबर २०१७ पासून रु. ३३४८ ते रु. १२४५ या पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविल्यानंतर १९ ऑगस्टला रु. ३४२४ ला बंद भाव देऊन ब्रेक आउट म्हणजेच तेजीचे संकेत दिले आहेत. आलेखानुसार जोपर्यंत या कंपनीच्या शेअरचा भाव रु. २१५८ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत दीर्घावधीमध्ये आणखी वधारू शकतो.

आयशर मोटर्स ही एक भारतीय बहुराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह कंपनी आहे, जी मोटारसायकल आणि व्यावसायिक वाहने तयार करते. रॉयल एनफिल्ड या प्रतिष्ठित ब्रँडची ही कंपनी मालक आहे, जो की मध्यम आकाराच्या मोटरसायकल (२५० ते ७५० सीसी) वर केंद्रित आहे. क्लासिक, बुलेट, हिमालयन हे काही ब्रँड आहेत, जे कंपनीच्या रॉयल एनफिल्ड ब्रँडअंतर्गत येतात. जागतिक स्तरावर ६० पेक्षा जास्त देशांमध्ये कंपनीचे उत्पादन विकले जाते. तसेच संरक्षणात्मक राइडिंग पोशाख, शहरी कॅज्युअल पोशाख आणि मोटरसायकल अॅक्सेसरीजचादेखील कंपनी व्यवसाय करते. संभाव्य १२५ सीसी प्लस बाईक बाजारपेठ काबीज करण्यासाठी कंपनीने अलीकडील काळात नव्याने दाखल केलेल्या ‘हंटर ३५०’ला आकर्षक किंमतीमुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कंपनीने व्यवसायवृद्धीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्वालालंपूर, मेक्सिको आदी ठिकाणी नवी आउटलेट उघडले आहेत. व्होल्वो आयशर कमर्शियल व्हेइकल्स लि. (व्हीईसीव्ही) हा व्होल्वो आयशर कमर्शिअल वाहने तयार करण्यासाठी आयशरचा स्वीडनच्या एबी व्होल्वोसोबत संयुक्त उपक्रम आहे. व्हीईसीव्ही मार्फत आयशरने चंडीगडला पहिली ई-बस पुरवली आहे, तर सुरत राज्य परिवहन उपक्रमाकडून १२० इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर प्राप्त झाली आहे. जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार, कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ झाली असून, तो ६११ कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्या दहा वर्षांत कंपनीने कर्जाचे प्रमाण कमी ठेवत गुंतविलेल्या भांडवलावर प्रति वर्ष १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत व्यवसाय केला आहे. जागतिक पातळीवरील निर्माण झालेल्या पुरवठा साखळीतील समस्या, सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यामध्ये निर्माण झालेली कमतरता आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ, ग्राहकांचा बदलता ट्रेंड आदी अनेक कारणांमुळे या कंपनीच्या उत्पादन; तसेच विक्रीवर नकारात्मक परिणाम झाला होता. मात्र, आगामी काळात बाजारात सणासुदीचा हंगाम असल्याने ग्राहकांच्या बदलत्या भावना, पुरवठा साखळी, तसेच सुट्या भागांची उपलब्धता सुधारत असल्याने कंपनी व्यवस्थापनास उत्तम प्रकारे व्यवसायवृद्धीची अपेक्षा आहे. आगामी काळात या कंपनीच्या शेअरने तेजीची वाटचाल केल्यास मर्यादित धोका स्वीकारून आवश्यकतेनुसार स्टॉपलॉस तंत्राचा वापर करत तेजीचा व्यवहार करणे योग्य ठरू शकेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या