फडणवीसांना ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हटल्यावरुन नितेश राणे आणि केसरकर आमने-सामने



शिवसेनेच्या फुटीर गटाचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते तसेच विद्यमान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि राणे कुटुंबीयांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद रंगला होता. हा वाद शांत झाल्यानंतर केसरकर आणि भाजपाचे आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे कोकणामधील मुंबई विद्यापिठाच्या एका का्यक्रमाला एका मंचावरही एकत्र दिसून आले होते. मात्र आता राज्यात सत्तेत असणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारमधील या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा हिंदूहृदयसम्राट या विषयावरुन मतभेद निर्माण झाले आहेत. केसरकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत नितेस राणेंच्या भूमिकेला विरोध केला आहे.

आपल्या वक्तव्यांमुळे आणि टीका करण्याच्या शैलीमुळे कायमच चर्चेत असणाऱ्या नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘हिंदूहृदयसम्राट’ असं म्हटलं आहे. श्रीरामपुरमध्ये स्थानिकांसमोर जाहीर भूमिका मांडताना नितेश राणेंनी फडणवींचा ‘हिंदूहृदयसम्राट’ असा उल्लेख केल्यानंतर यावरुन राजकीय वर्तुळातून मतं व्यक्त केली जात असतानाच केसरकर यांनाही पत्रकारांनी यावरुन प्रश्न विचारला असता त्यांनी नितेश राणेंचं हे विधान अप्रत्यक्षपणे खोडून काढलं.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

श्रीरामपुरमध्ये बोलताना नितेश राणेंनी स्थानिक अधिकाऱ्यांना धमकी वजा इशारा देत ‘हिंदूहृदयसम्राट’ असा फडणवीस यांचा उल्लेख केला. “महाराष्ट्रात हिंदुतत्वादी सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कट्टर हिंदूत्ववादी आहेत. हिंदूहृदयसम्राट उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस आहेत. हे या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं. कुठलाही अधिकारी आमच्या हिंदू मुलाकडे वाकड्या नजरेने बघेल तर त्याचे डोळे जागेवर राहणार नाहीत. हा इशारा या निमित्ताने देतोय,” असं नितेश राणेंनी आपल्या भाषणात म्हटलं.

केसरकर काय म्हणाले?

नितेश राणे फडणवीस यांना हिंदूहृदयसम्राट म्हणाल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी औरंगाबादमध्ये केसरकारांना प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना, “हे बघा आमच्या दृष्टीने किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीने हिंदूहृदयसम्राट हे बाळासाहेब ठाकरेच आहेत. ते त्यांना जनतेनं दिलेलं एक पद आहे,” असं म्हणत अप्रत्यक्षपणे नितेश राणेंचं विधान खोडून काढलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या