Breaking News

सत्तेला सभासदांनी मतदानाच्या माध्यमातून लावला सुरुंग


 अकोले -
सहकारी साखर कारखानदारीत शक्यतो सत्ता बदल होत नाही. कारण सहकारात अनेक वर्ष सत्ता उपभोगलेले कालंकाराने 'मालक' होतात. या मालकांशी लढत देण्याची ताकद सामान्य शेतकऱ्या ंमध्ये नसते, असा आजवरचा समज अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी खोटा ठरवला. माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे  त्यांचे चिरंजीव माजी आ. वैभव पिचड  यांना सार्वत्रिकी निवडणुकी नंतर आता सहकारातही पराभव पत्करावा लागला. अगस्ती कारखान्यावरील 28 वर्षांच्या त्यांच्या सत्तेला सभासदांनी आज मतदानाच्या माध्यमातून सुरुंग लावला....

जिल्ह्यातील इतर सहकारी साखर कारखान्यांसाठी देखील सत्ता बदलण्याची ही पाऊलवाट ठरू शकेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करू लागले आहेत.

गेल्या २८ वर्षांपासून असलेला पिचडांची सत्ता आता गेली आहे. पिचड पिता-पुत्रांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ आणि आमदार डॉ. किरण लहामटे व बँकेच संचालक सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी समृद्धी मंडळ यांच्यात लढत झाली. सुरुवातीपासूच समृद्धी मंडळाने आघाडी घेत घौडदौड कायम ठेवली.

कारखान्याच्या २१ जागांसाठी रविवारी ८७.३९ टक्के मतदान झाले. माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या शेतकरी विकास मंडळ तर त्यांच्या विरोधात आमदार डॉ. किरण लहामटे व जिल्हा बँक संचालक सीताराम गायकर यांच्या शेतकरी समृद्धी मंडळ यांच्यात लढत होती. पहिलाच निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सीताराम गायकर ४९ पैकी ४१ मते घेऊन विजयी झाले. विरोधी राजेंद्र झावरे यांना ६ मते मिळाली. २ मते बाद झाली.

त्यानंतर अकोले गटातील शेतकरी समृद्धी मंडळाचे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. इंदोरी सर्वसाधारण उत्पादक गटात माजी आमदार वैभवराव पिचड यांच्यासह कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश नवले, माजी संचालक भाऊसाहेब खरात यांचा पराभव झाला. तर शेतकरी समृद्धी मंडळाचे विद्यमान संचालक अशोक देशमुख, पाटीलबा सावंत व प्रदीप हासे विजयी झाले. अकोले, इंदोरी गटानंतर आगर गटातील शेतकरी समृद्धी मंडळाचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आणि समृद्धी मंडळाने बहुताकडे वाटचाल सुरू केली. 

No comments