मुंबई : भारतीय शेअर बाजारातील नॅशनल स्टॉक्स एक्स्चेंजच्या निर्देशांकाला अर्थात निफ्टीला पाच महिन्यांनंतर 'अच्छे दिन' पहायला मिळाले आहेत. कारण निफ्टी ४ एप्रिलनंतर पहिल्यांदाच पाच महिन्यांनंतर 18,000 पॉईंट्सवर बंद झाला. आर्थिक, तेल, वायू आणि आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये वाढ झाल्यानं हा परिणाम पहायला मिळाला. त्याचबरोबर जागतिक बाजारपेठांमध्ये बड्या गुंतवणुकदारांनी खरेदीचा धडाका लावल्यानं गेल्या आठवड्यात प्रमुख मध्यवर्ती बँकांमध्ये चलनवाढीचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक ठरला आहे.
टॉपच्या 50 कंपन्यांचे निर्देशांक 152 अंकांनी अर्थात 0.8 टक्क्यांनी वाढून 18,088.30 वर पोहोचला. तसेच सेन्सेक्स दिवसभरात सर्वात मजबूत पातळीवर 520.2 अंकांनी अर्थात 0.9 टक्क्यांनी वधारुन 60,635.3 वर पोहोचला. भारतीय शेअर बाजारातील या दोन्ही निर्देशांकांनी पाच महिन्यांहून अधिक काळानंतर सर्वोच्च पातळी गाठत बाजार बंद झाला.
बजाज फिनसर्व्ह, ब्रिटानिया, भारतीय एअरटेलनं मिळाला सर्वाधिक नफा
निफ्टीमधील ३४ शेअर्स दिवसभरात वधारले. यामध्ये बजाज फिनसर्व्ह, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स, इंडसइंड बँक, ब्रिटानिया आणि भारती एअरटेल या कंपन्यांनी सर्वाधिक नफा मिळवला. तर एचडीएफसी बँक, रिलायन्स, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह आणि भारती एअरटेल यांनी दोन्ही मुख्य निर्देशांकांत वाढ नोंदवली. तसेच टायटन, लार्सन अँड टुब्रो, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये प्रत्येकी 1.5 टक्क्यांच्या आसपास वाढ नोंदवली. दुसरीकडे, श्री सिमेंट, सिप्ला, आयशर मोटर्स, डिवीज लॅब्स, भारत पेट्रोलियम, टेक महिंद्रा आणि टीसीएस या कंपन्यांचे शेअर्स ०.३ टक्के ते ०.९ टक्क्यांदरम्यान घसरले.
भारतीय शेअर बाजार लवकरच करणार नवा विक्रम
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार म्हणाले, "सध्या सुरू असलेली बाजारातील तेजी मुख्यत्वे FII धोरणात अचानक झालेल्या बदलामुळं झाली आहे. किरकोळ गुंतवणूकदार आणि मजबूत अर्थव्यवस्थेकडून बाजाराला मिळणारा पाठिंबा यामुळंही बाजार वधारायला फायदा झाला आहे. बाजाराचं हे चांगलं लक्षण असून निर्देशांकांमध्ये लवकरच नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचण्याची क्षमता बनली आहे"
युरोपीअन बाजारांमध्येही हिरव्या रंगानं सुरुवात
दरम्यान, युरोपीयन शेअर बाजारांनी दिवसाची सुरुवात हिरव्या रंगात केली. आशियातील बहुतांश ट्रेंड या बाजारात प्रतिबिंबित झालेले पहायाले मिळाले.
0 टिप्पण्या