'दृश्यम-२' चित्रपटाचा फर्स्ट लूक. चला, एक छोटीशी गोष्ट ऐकूया...दिवस होता २ ऑक्टोबरचा. विजय साळगावकर आपल्या कुटुंबासोबत पणजीला स्वामी चिन्मयानंद यांच्या सत्संगासाठी जात होता. तिथे त्यांनी वाटेत एका हॉटेलमध्ये पावभाजी खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी ३ऑक्टोबरला पूर्ण कुटुंब घरी परतलं. बस्स..ही एवढी छोटी गोष्ट ऐकल्यानंतर आपण अंदाज बांधला असेलच की आपण बोलतोय अजय देवगणच्या 'दृश्यम' सिनेमाविषयी. या सिनेमाचा सीक्वेल आता आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. दृश्यम २ चा फर्स्ट लूक रीलिज करण्यात आला आहे. मेकर्सनी सोशल मीडियावर या सिनेमाचा फर्स्ट लूक रीलिज केला आहे.

'दृश्यम १' मधील याच कहाणीची आठवण करुन देत अजय देवगणनं 'दृश्यम २' चे पोस्टर शेअर केले आहे. सिनेमाचा टीझर शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी रीलिज केला जाणार आहे. अजयनं सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,''२ आणि ३ ऑक्टोबरला काय झालेलं लक्षात आहे नं? विजय साळगावकर पुन्हा एकदा आपल्या कुटुंबासोबत तुम्हाला भेटायला येत आहे''.

या फोटोत अजय देवगण सिनेमातील आपल्या दोन मुली आणि बायकोच्या भूमिकेत असलेल्या श्रिया शरन सोबत दिसत आहे. मेकर्सनी अद्याप कोणाचाही चेहरा समोर आणलेला नाही. बरोबर एक दिवस आधी अजयनं सिनेमातील गोष्टीत ज्या-ज्या हत्यारांचा समावेश आहे ती हातात घेतलेला फोटो शेअर करत प्रेक्षकांना जुन्या गोष्टीची आठवण करून दिली आहे. या सिनेमात तब्बू देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

अजय देवगणचा 'दृश्यम' सिनेमा २०१५ साली रीलिज झाला होता. या सिनेमाला दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामतने त्यावेळी दिग्दर्शित केले होते. 'दृश्यम'मध्ये अजय देवगण,श्रिया शरन, तब्बू,इशिता दत्ता,रजत कपूर आणि मृणाल जाधव यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा सिनेमा २०१३ मध्ये रीलिज झालेल्या मल्याळम सिनेमाचा रीमेक होता. मल्याळम सिनेमात मोहनलाल मुख्य भूमिकेत होता. साऊथचा 'दृश्यम २' गेल्या वर्षी रीलिज झाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या