टी-२० वर्ल्डकपला सुरु होण्याआधी भारताकडे ऑस्ट्रेलियाच्या निमित्ताने नवे प्रयोग करण्याची संधी आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये टी-२० वर्ल्डकप सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधातील तीन सामन्यांच्या मालिकेसाठी मोहालीत दाखल झाला आहे. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने वर्ल्डकपमध्ये विराट कोहली सलामीला फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे.
आशिया कप स्पर्धेत विराट कोहलीने अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात शतक ठोकत अखेर शतकांचा दुष्काळ संपवला. या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विराट कोहली सलामीला उतरला होता. विराटने यावेळी फक्त ६१ चेंडूत १२२ धावा करत जबरदस्त खेळी केली. भारतीय फलंदाजाकडून करण्यात आलेली ही सर्वाधिक धावसंख्या ठरली.
“तुमच्यासाठी पर्याय उपलब्ध असणं नेहमीच चांगलं असतं. संघात लवचिकता असताना वर्ल्डकप खेळणं महत्त्वाचं असतं. कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी तुमचे फलंदाज तयार असावेत असं तुम्हाला वाटत असतं. जेव्हा आम्ही नवीन काही प्रयोग करतो, याचा अर्थ समस्या आहे असा होत नाही,” असं रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं.
रोहित शर्माने यावेळी कोहलीची आयपीएलमधील कामगिरी आणि सलामीसाठी इतर पर्याय उपलब्ध ठेवण्यासंबंधीही भाष्य केलं. तो म्हणाला “आमच्या खेळाडूंचा दर्जा आणि त्यांच्यातील क्षमतेची आम्हाला जाणीव आहे. पण हो, विराटला सलामीला उतरवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. आम्ही हे नेहमी लक्षात ठेवू. आम्ही सलामीसाठी तिसरा फलंदाज घेतलेला नाही. आय़पीएलमध्ये त्याने अनेकदा सलामीला खेळी केली असून, चांगली फलंदाजी केली आहे. त्यामुळे नक्कीच हा पर्याय उपलब्ध आहे”.
याचा अर्थ के एल राहुलवर चांगली खेळी करण्याचा दबाव असेल. चांगली कामगिरी न केल्यास त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. याबद्दल राहुलला पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं होतं, तेव्हा त्याने आपल्याला बाहेर काढावं अशी इच्छा आहे का? अशी विचारणा केली होती
0 टिप्पण्या