पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे (PLC) प्रमुख कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशासह पंजाब लोक काँग्रेसदेखील भाजपमध्ये विलीन झाली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर नाराज होऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत पीएलसीची स्थापना केली होती. त्यानंतर आता अमरिंदर सिंग यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपची ताकद आणखी वाढली असून, आगामी लोकसभेत याचा फायदा भाजपला होऊ शकतो.
पीएलसीने भाजप आणि सुखदेवसिंग धिंडसा यांच्या नेतृत्वाखालील शिरोमणी अकाली दल (युनायटेड) यांच्याशी युती करून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, यामध्ये एकही उमेदवार विजयी होऊ शकला नव्हता तसेच स्वतः सिंग यांचा गड मानल्या जाणाऱ्या पटियालामध्येदेखील सिंग यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. सिंग यांचा मुलगा रणिंदर सिंग आणि मुलगी जय इंदर कौर यांनीदेखील अमरिंदर सिंग यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
अमरिंदर सिंग यांनी 12 सप्टेंबर रोजी शाह यांच्याशी झालेल्या भेटीनंतर सांगितले होते की, राष्ट्रीय सुरक्षा, पंजाबमधील वाढता अंमली पदार्थांचा प्रश्न, दहशतवाद आदी विविध विषयांसह राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले होते. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले सिंग हे पूर्वीच्या पटियाला राजघराण्याचे वंशज आहेत.
0 टिप्पण्या