"पन्नास खोके .. एकदम ओके" या घोषणेमुळे सत्ताधाऱ्यांना मिरच्या झोंबल्या : विरोधी पक्ष नेते अजित पवार



 राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील आमदारांच्या बंडखोरीवरून सातत्याने विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. यामध्ये विधानभवनात दिलेल्या “५० खोके, एकदम ओके” या घोषणेची तर महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाला खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीवरून टोलेबाजी केली. तसेच, राज्य सरकार कुणाच्या दबावाखाली काम करतंय का? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

“शिंदे सरकार कुणाच्या दबावाखाली झुकतंय का? शिंदे सरकारमध्ये दबाव झुगारण्याची ताकद नाहीये का? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय की कारण नसताना कुणाच्यासमोर झुकायचं नाही. पण इथे तर झुकायला सुरुवात झाली. अजून तर अडीच महिनेही नाही झाले”, असं अजित पवार म्हणाले.

५० खोके, एकदम ओके या विरोधकांच्या घोषणेच्या मिरच्या सत्ताधाऱ्यांना झोंबल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले. “५० खोके, एकदम ओके या घोषणा त्यांना झोंबल्या. खरंच..खोटं नाही सांगत. रात्री बावचळून उठतात. खोकं खोकं खोकं.. ओकं ओकं ओकं! आरे कशाचं खोकं आणि कशाचं खोकं?” असा टोला अजित पवारांनी यावेळी लगावला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या